भीषण आगीमध्ये वृद्घ दांम्पत्यासह तीन शेळ्यांचा होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhimrao Pawar and Kamal Pawar

गाडेगाव (ता. बार्शी) येथे ह्दयद्रावक घटना घडली असून, सोमवारी पहाटे वस्तीवर राहणेस असलेल्या झोपडीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत वृद्ध पती-पत्नीसह तीन शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला.

Fire : भीषण आगीमध्ये वृद्घ दांम्पत्यासह तीन शेळ्यांचा होरपळून मृत्यू

गाडेगाव (ता. बार्शी) - येथे ह्दयद्रावक घटना घडली असून, सोमवारी (ता. १३)रोजी पहाटे वस्तीवर राहणेस असलेल्या झोपडीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत वृद्ध पती-पत्नीसह तीन शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, तहसील कार्यालयानेही पंचनामा केला आहे. आगीमध्ये वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

भीमराव काशीराम पवार (वय-९५), कमल भीमराव पवार (वय-९०) असे आगीमध्ये होरपळून जागीच मृत्यु झालेल्या वृद्ध दाम्पत्याची नावे असून, झोपडी शेजारी बांधलेल्या गोठ्यालाही आग लागून तीन शेळ्या बांधलेल्या अवस्थेत मृत झाल्या. मंगेश मोहिते यांनी तालुका पोलिस ठाण्यात नोंद केली. ही घटना सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान घडली.

भीमराव पवार यांना नऊ मुली असून सर्व विवाहीत आहेत. पत्नी कमल, नातू प्रथमेश मोहिते (वय-१२) यांचेसह गाडेगाव येथील वस्तीवर झोपडीमध्ये तिघेजण वास्तव्यास होते. सोमवारी (ता. १३) रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान आजी कमल उठली आणि झोपडीमध्ये असलेल्या चुलीवर पाणी तापण्यासाठी ठेवले आणि आजीने प्रथमेश यांस झोपेतून उठवून रेडी सुटली आहे ती बांध, आघोळीला पाणी ठेवले आहे असे सांगितले.

त्यानंतर थोड्याच वेळात आजी जोरात ओरडून म्हणाली, परथ्या पळ, पळ झोपडीला आग लागली आहे. त्यावेळी मी बाहेर आलो व बाहेर ठेवलेल्या बॅरल मधील पाणी मारुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आगीने रौद्ररुप धारण केले होते. तरीही आजी म्हणाली मी आजोबाला बाहेर काढते तू जा आणि शेजारी राहणाऱ्यांना बोलावून आण त्यावेळी मी पळत जाऊन जमिर मुलाणी, दिलावर मुलाणी यांना घेऊन आलो.

तोपर्यंत पूर्ण झोपडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती आजी-आजोबांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर झोपडी शेजारी असलेल्या गोठ्यालाही आग लागून बांधलेल्या अवस्थेतील तीन शेळ्या जागीच मृत्यूमुखी पडल्या होत्या. प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले होते तपास पोलिस हवालदार जनार्धन शिरसट करीत आहेत.

टॅग्स :firedeath