
Shahaji Patil : गाडगेबाबांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक; ऍड. आमदार शहाजी पाटील
सांगोला : राष्ट्रसंत गाडगेबाबांनी माणसातील देव पाहिला होता. बाबांनी आपले संपूर्ण आयुष्य उपेक्षित, वंचित, गोरगरिबांसाठी खर्ची घातलं. कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी - परंपरा दूर करण्यासाठी मोठे कार्य केले.
गाडगेबाबांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक असे आहेत. त्यांचे विचार पुढे नेण्याची गरज असल्याचे मत ऍड. आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त परीट गल्ली, सांगोला येथे आयोजित कार्यक्रमात शहाजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, डॉ. बाबासाहेब देशमुख, चेतनसिंह केदार, खरेदी-विक्री संघाचे नूतन चेअरमन रमेश जाधव, डॉ. पियुष साळुंखे, अनिल खडतरे, खंडू सातपुते, सुरज बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, संजय देशमुख सर, गुंडा खटकाळे, शिवाजी जावीर, दुय्यम निबंधक चव्हाण साहेब, समाधान सावंत, गजानन भाकरे,
अच्युत फुले, हमीद इनामदार, बापूसाहेब भाकरे, प्रताप इंगोले, वसंत सुपेकर, हरिभाऊ जगताप, प्रकाश भोसले, सिद्धेश्वर झाडबुके, विलास म्हेत्रे, सुरेश फुले, शंभु माने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी बंडगर महाराज यांचे गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर कीर्तन झाल्यानंतर गाडगेबाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दादा जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र यादव यांनी केले. कार्यक्रमाला शहर व तालुक्यातील नागरिक, महिला भगिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीट समाज सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सांगोल्यात गाडगेबाबांचे भव्यदिव्य समाजमंदिर उभारणार
सांगोला शहरात राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या समाजमंदिर उभारणीसाठी ३५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर केला असून लवकरच जागेचीही उपलब्धता करून १ कोटी रुपये खर्चून भव्य दिव्य असे समाजमंदिर उभे करून देऊ - ऍड. शहाजीबापू पाटील, आमदार, सांगोला.