
Solapur News : 'घाटणे' राज्यातील पहिले प्लॅस्टीक सॅनीटरी पॅड मुक्त गाव
मोहोळ : धुळे येथील "अशय" सोशल ग्रुप या संस्थेने मोहोळ तालुक्यातील घाटणे हे गाव दत्तक घेऊन राज्यातील पहिले "प्लास्टिक सॅनिटरी पॅड मुक्त गाव" केल्याची माहिती या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सीमा खंडाळ यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना श्रीमती खंडाळ म्हणाल्या, महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. मात्र त्या प्रक्रियेत अनेक लहान मोठ्या शारीरिक समस्या कडे फारसे लक्ष दिले जात नाही. सध्या प्लॅस्टिकच्या वस्तूंचा विविध ठिकाणी सर्रास वापर केला जातो, त्यात महिलाही मागे नाहीत. सध्या तरुणी पासून ते मध्यमवयीन महिला पर्यंत प्लास्टिक सॅनिटरी पॅडचा सर्रास वापर केला जातो.
मात्र पर्यावरणाच्या व आरोग्याच्या दृष्टीने ते अडचणीचे ठरते आहे. प्लास्टिक चे विघटन होत नाही, म्हणून कापडी पॅड वापरण्याची संकल्पना त्यातून पुढे आली. एक महिला कमीत कमी बारा ते पंधरा प्लॅस्टिक सॅनिटरी पॅड वापरते. मात्र त्याचा उपयोग संपल्यावर ते कचऱ्यांच्या कुंडीत टाकले जाते. त्याचे विघटन होत नसल्याने खताच्या माध्यमातून ते शेतात गेले तर जमिनीचा पोत बिघडतो पर्यायाने पर्यावरणाचाही ऱ्हास होतो.
कापडी पॅड हे सुती कपड्याचे बनविले आहे. त्यात एक प्रतिबंधित कापडाचा थर वापरला जातो, त्यामुळे इन्फेक्शन चा धोका पूर्ण नाहीसा होतो. हे पॅड किमान दोन ते तीन वर्षे वापरता येते. या उपक्रमाची संकल्पना श्रीमती खंडाळ यांनी सांगितल्या नंतर गावातील महिलांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. लोक वर्गणीतून हा उपक्रम राबविण्यात आला. घाटणे गावात ३४३ महिला व ४६९ मुली आहेत त्यापैकी २८५ महिलांना प्रत्येकी ५ चा एक संच वितरित करण्यात आला. ते पॅड कसे शिवायचे याचे ही प्रशिक्षण देण्यात आले. संच दिल्यानंतर त्या महिला पॅड चा वापर खरोखर करतात का नाही याचा सर्वे करण्यात आला.
त्यात घाटणे गावातील महिला शंभर टक्के या पॅडचा वापर करत असल्याचे निदर्शनाला आले. त्यामुळे हे गाव प्लास्टिक सॅनिटरी पॅड मुक्त झाल्याचे निदर्शनाला आले. या माध्यमातून गावातील अनेक महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. या उपक्रमासाठी सरपंच ऋतुराज देशमुख, रितेश पोपळघट, ग्रामसेविका पार्वती माळी, डॉ प्रीती जाधव, आशा वर्कर रूपाली पटणे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.
मी घाटणे हे गाव दत्तक घेऊन ते गाव प्लॅस्टिक सॅनिटरी पॅड मुक्तीचा ध्यास घेतला. गावकऱ्यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला, त्यामुळेच हे गाव राज्यातील एकमेव सॅनिटरी पॅड मुक्त गाव झाले आहे. घाटणे म्हणजे आता माझे माहेर झाले आहे. आणखी तीन गावे या उपक्रमासाठी मी दत्तक घेतली आहेत. या बाबत महिलात वरचे वर मोठी जागृती होत असल्याचे दिसत आहे.
- सीमा खंडाळ अध्यक्ष अशय सोशल ग्रुप
धुळे येथील अशय या संस्थेने आमच्या गावासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. त्याला गावातील महिलांनीही मोठा प्रतिसाद दिला. त्या मुळेच हे यश प्राप्त झाले. या यशाचे सर्व श्रेय गावातील महिला व या उपक्रमात सहभागी असणाऱ्या महिलांना जाते.
- ऋतुराज देशमुख सरपंच घाटणे