बियर शॉपीसाठी पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ! वाचा, सोलापुरातील गुन्हेगारी

बियर शॉपीसाठी पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शिल्पा आनंद मड्डी (रा. प्रियदर्शन नगर, जुने विडी घरकुल) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.
विवाहितेचा छळ
विवाहितेचा छळCanva

सोलापूर : बियर शॉपीसाठी पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शिल्पा आनंद मड्डी (रा. प्रियदर्शन नगर, जुने विडी घरकुल) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी शिल्पा यांचा आनंद वसंत मड्डी याच्यासोबत विवाह झाला होता. सासरच्यांनी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. माहेरून लॅपटॉप, मोबाईल, नवीन गाडी आण म्हणून तगादा लावला. त्यासाठी नकार दिल्याने त्यांनी शिवीगाळ केली. तसेच नवीन बियर शॉपी सुरू करायला माहेरून पैसे आण म्हणूनही छळ केला. त्यानंतर बंगळूर येथे नवीन घर घ्यायचे आहे, त्यासाठी पैसे आण म्हणून त्रास दिला. पैसे आण म्हणून छळ करीत जीवे मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली. शिवराज कस्सा याने ‘तू खूप सुंदर आहेस, मला खूप आवडतेस’ म्हणून द्वेषभावना निर्माण केली. पतीचे कान भरून छळ करायला लावला, असेही फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून पती आनंद मड्डी याच्यासह विजयालक्ष्मी वसंत मड्डी, वसंत रामचंद्र मड्डी (तिघेही रा. योगेश्वर नगर, जूने विडी घरकुल) आणि प्रीती शिवराज कस्सा व शिवराज कस्सा (दोघेही रा. गणेश पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक चव्हाण तपास करीत आहेत.

बोरामणीत मन्ना जुगार खेळणाऱ्यांवर छापा
बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) शिवारातील कारंजा तांड्यातील पाण्याच्या टाकीजवळील पत्राशेडमध्ये ५२ पत्त्यांचा अंदर-बाहर नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. आठजणांना पकडून १४ हजार ६४० रुपयांची रोकड आणि दुचाकीसह एकूण सहा लाख ६४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला. कारंजा तांडा परिसरात काही तरुण मन्ना जुगार खेळत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी गोलाकर बसलेल्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एक चारचाकी, दोन दुचाकीसह काही रोकड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक खुणे, उपनिरीक्षक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार शिवाजी घोळवे, पोलिस हवालदार परशुराम शिंदे, मोहन मनसावाले, लालसिंग राठोड, यश देवकते, सूरज रामगुडे, समर्थ गाजरे, प्रमोद माने यांच्या पथकाने केली.

अल्पवयीन मुलगी बेपत्ता
सोलापूर : शहरातील हनुमान नगर परिसरातील १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी २९ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता घराबाहेर पडली. रूपाभवानी मंदिरात दर्शन घेऊन ती परत घरी आली. त्यानंतर ती घराजवळून बेपत्ता झाली. कोणीतरी तिला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. पोलिस तिचा शोध घेत आहेत.
----
घरगुती कारणातून मारहाण
सोलापूर : ‘तू माझ्या भावजयीसोबत राहून माझ्या भावाचा संसार उद्‌ध्वस्त केला’ असे म्हणत मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर नातेवाइकांसह घरी येऊन घरातील फ्रीज, होम थिएटर, पंख्याची मोडतोड केली. घरातील लोकांना मारहाण केली. त्यावेळी माझ्या उजव्या डोक्याला मार लागल्याने रक्त आले. लहान मुलाला मुक्कामार लागला. पतीच्या पाठीला मार लागला, अशी फिर्याद सुनीता माळप्पा बिरुणगी (रा. हब्बूवस्ती, देगाव नाका) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. त्यावरून बाळाबाई आखाडे, भीमराव ऊर्फ भावेस कैलास क्षीरसागर व इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
----
चोरट्याने पळविली दुचाकी
सोलापूर : रूपाभवानी मंदिर परिसरातील जुना तुळजापूर नाका ते डी-मार्टकडे जाणाऱ्या रोडवर उभी केलेली दुचाकी (एमएच १३, बीके ७३९४) चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद अय्याजफैज अहमद सय्यद (रा. कुर्बान हुसेन नगर) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. पोलिस नाईक गायकवाड तपास करीत आहेत.
----
मटका खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल
सोलापूर : शिवशक्ती चौक परिसरातील इरेश पान शॉपजवळ कल्याणचा मटका खेळणाऱ्या इरेश मल्लिनाथ अक्का व राकेश कोरे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. तर जेलरोड पोलिस ठाणे परिसरातील सुधीर गॅस एजन्सी ते साईबाबा नगराकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर सागर हॉटेलसमोरील महापालिकेच्या सहा नंबर शाळेलगत मटका जुगार चालविणाऱ्या राकेश कोरे, श्रीनिवास सिद्राम मुदगुंडी (रा. रविवार पेठ) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
---
पोलिस अधिकाऱ्यांना नवरात्रात मॉर्निंग ड्यूटी
सोलापूर : नवरात्र महोत्सवात प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी व इतर अधिकाऱ्यांना दिवस-रात्र (मॉर्निंग व नाईट) अशी ड्यूटी करावी लागत आहे. मॉर्निंग ड्यूटीवेळी रात्री उशिरापासून सकाळपर्यंत अधिकाऱ्यांना त्यांच्या परिसरात गस्त घालावी लागते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने अधिकाऱ्यांना अशी ड्यूटी करावी लागत आहे.
----
होटगी रोडवरून दुचाकी चोरी
सोलापूर : होटगी रोडवरील किनारा हॉटेलजवळील शुभम हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी कार्यालयाबाहेर उभी केलेली दुचाकी (एमएच १३, डीडी ०२८५) चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद नागनाथ पांडुरंग शिवशरण (रा. वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. हँडल लॉक करून कामानिमित्त त्या ठिकाणी गेल्यावर चोरट्याने दुचाकी चोरल्याचेही त्यांनी पोलिसांनी सांगितले. पोलिस नाईक बर्डे तपास करीत आहेत.
----
दुचाकीची वाहनाची सायकलीला धडक
सोलापूर : जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेजवळून महापालिकेच्या झोन कार्यालयाकडे सायकलीवरून येताना दुचाकीस्वाराने (एमएच १३, सीएल ००८६) धडक दिली. या अपघातात सिद्धाराम सावळा वाघमारे (रा. सिद्धेश्वर नगर, सैफूल) हे जखमी झाले. त्यांच्या सायकलीचेही नुकसान झाले असून, त्यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस नाईक कांबळे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com