esakal | पंढरपुरात नॉन-कोरोना रुग्ण विठ्ठलभरोसे ! तातडीने उपचार होण्यात अडचणी

बोलून बातमी शोधा

Corona
पंढरपुरात नॉन-कोरोना रुग्ण विठ्ठलभरोसे ! तातडीने उपचार होण्यात अडचणी
sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, अन्य आजारांच्या रुग्णांवर तातडीने उपचार होण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. बहुतांश हॉस्पिटलमध्ये कोरोना टेस्ट केल्याशिवाय रुग्ण दाखल करून घेतले जात नाहीत. ही टेस्ट करण्याची व्यवस्था संबंधित हॉस्पिटलमध्ये नसते, त्यामुळे रुग्णाला आणि नातेवाइकांना कमालीच्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एकंदरीत, पंढरपुरात सध्या कोरोना नसलेल्या रुग्णांची अवस्था विठ्ठलभरोसे झाली आहे.

पंढरपूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक महत्त्वाची हॉस्पिटल्स ही कोव्हिड डेडिकेटेड हॉस्पिटल्स झाली आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाशिवाय अन्य काही कारणाने एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ लागला तर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करताना नातेवाइकांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा: बीपी, शुगर, लिव्हर, किडनीचा त्रास ! तरीही ऐंशी वर्षांच्या गुरुजींनी शिकवला कोरोनाला धडा

येथील सेवानिवृत्त पालिका मुख्याधिकारी विठ्ठल केसकर यांना गुरुवारी असाच अनुभव आला. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या त्यांच्या मित्राला पहाटे श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. संबंधितांच्या घरातील लोकांनी केसकर यांना कळवले. केसकर यांनी शेजारी राहणारे बांधकाम व्यावसायिक कपिल डिंगरे यांना बोलावून घेतले. त्या दोघांनी तातडीने संबंधित रुग्णास कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने अन्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला.

पहिल्या हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी त्यांना रुग्णास कोव्हिड हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. कोव्हिड हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ऑक्‍सिजन लेव्हल किती आहे, असे विचारून तेथील डॉक्‍टरांनी बेड शिल्लक नसल्याचे सांगितले. तिसऱ्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तेथील डॉक्‍टरांनी बेड आहे, परंतु संबंधित रुग्ण कोव्हिड पेशंट असल्याचे समजल्याशिवाय दाखल करून घेता येणार नाही, असे सांगितले. चौथ्या हॉस्पिटलमध्ये बाहेर वॉचमननेच जागा शिल्लक नसल्याचे सांगितले.

हेही वाचा: कोरोनाविरुद्ध बार्शीकरांची युनिटी ! सर्व कोरोना रुग्णांना देणार मोफत प्लाझ्मा, नाश्‍ता व जेवण

दरम्यान, केसकर आणि डिंगरे यांनी त्यांच्या जवळील पोर्टेबल ऑक्‍सिजन कॅनमधून संबंधितास थोडा ऑक्‍सिजन दिल्यानंतर त्याना बरे वाटू लागले. डॉ. सुधीर देशपांडे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी औषधे दिली आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

सद्य:परिस्थितीत डॉक्‍टर मंडळी अहोरात्र काम करत आहेत. परंतु, शासनाने कोव्हिड टेस्टची वाट न बघता लक्षणावरून उपचार द्या, असे निर्देश दिलेले असताना एचआरसीटी आणि आरटी-पीसीआरचा आग्रह का धरला जातो? प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्टची व्यवस्था केल्यास त्यासाठी रात्री- अपरात्री अन्यत्र हॉस्पिटल शोधत फिरावे लागणार नाही आणि लोकांची गैरसोय दूर होईल.

- विठ्ठल केसकर, सेवानिवृत्त मुख्याधिकारी, पंढरपूर