40 कोटींच्या इलेक्‍ट्रिक बस खरेदीला ब्रेक! टेंडर प्रक्रिया दीड वर्षांपासून प्रलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 electric bus

नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत बस टेंडर प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.

40 कोटींच्या इलेक्‍ट्रिक बस खरेदीला ब्रेक!

सोलापूर : नाकापेक्षा मोती जड झालेल्या सोलापूर परिवहन उपक्रमासाठी घेणात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक बसचा बोलबाला गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. मात्र नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत बस टेंडर प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे 40 कोटींच्या इलेक्‍ट्रिक बस खरेदीला दुसऱ्यांदा ब्रेक लागला आहे.

हेही वाचा: सोलापूरकरामध्ये इलेक्‍ट्रिक वाहनांची क्रेझ

महापालिका परिवहन उपक्रमाचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि स्मार्ट सिटीत पर्यावरणपूरक इलेक्‍ट्रिक बस सुरू करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर 25 इलेक्‍ट्रिक बसची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली. परंतु या बसकरिता शासनाकडून मिळणारे उत्पन्न, महापालिकेचा हिस्सा, बसचे कालबाह्य वर्ष आदींचा ताळमेळ बसत नसल्याने आयुक्तांनी हा विषय फेटाळून लावला. त्यामुळे सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या इलेक्‍ट्रिक बस खरेदीचा विषय बारगळला. महापालिका व परिवहन उपक्रमाची आर्थिक परिस्थिती नसल्याने शहरासाठी स्मार्ट सिटी योजनेतून 50 इलेक्‍ट्रिकल बस मिळाव्यात यासाठी परिवहन समितीने प्रयत्न सुरू केले. परिवहन समितीने नोव्हेंबर 2020 च्या सर्वसाधारण सभेपुढे 50 इलेक्‍ट्रिक बसचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सभागृहाने मान्यता दिली.

हेही वाचा: सोलापूर : इलेक्‍ट्रिक वाहनांना आता महावितरणची ‘ऊर्जा’

त्यानंतर हा प्रस्ताव स्मार्ट सिटी संचालक बैठकीत ठेवण्यात आला. स्मार्ट सिटी बैठकीतही याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. इलेक्‍ट्रिक बसकरिता 40 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला. या 40 कोटींमध्ये 50 इलेक्‍ट्रिक बसेस, 70 स्मार्ट बसस्थानक, इलेक्‍ट्रिकल बसकरिता सातरस्ता बसडेपो येथे चार्जर पॉईंट विकसित करणे आदी कामांचा समावेश होता. इलेक्‍ट्रिक बस कन्सल्टंटच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार असून कंन्स्टलंटटची टेंडर प्रक्रिया राबविणे गरजेची होती. गेल्या वर्षभरापासून इलेक्‍ट्रिक बसचा पाठपुरावा परिवहन समितीकडून सुरू होता. मात्र नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत इलेक्‍ट्रिक बस टेंडर प्रक्रियेला तुर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रिक बस खरेदी विषयाला दीड वर्षात दुसऱ्यांदा ब्रेक लागला असून, टेंडर प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

हेही वाचा: राज्यात धावणार इलेक्‍ट्रिक बस - मुख्यमंत्री फडणवीस

चालू स्थितीतील बस आणि नव्याने येणाऱ्या इलेक्‍ट्रिक बस यांची योग्य सांगड घालून परिवहनचे उत्पन्न वाढविण्यासाठी समितीकडून नियोजन करण्यात आले होते. वारंवार पाठपुरावा करूनदेखील ही टेंडर प्रक्रिया झाली नाही. दोन्ही अधिकाऱ्यांच्या भांडणात आणि भाजप पक्षाचे वर्चस्व कमी करण्याच्या हेतूनेच इलेक्‍ट्रिक बस टेंडर प्रक्रिया थांबली आहे.

- जय साळुंखे, परिवहन समिती

सोलापूर महापालिका अथवा परिवहन स्वत:च्या खर्चातून इलेक्‍ट्रिक गाड्या घेण्यास सक्षम नाही. केंद्र शासनाकडून योजना येणार होती. ती योजना आली नाही. त्यामुळे बसचा अद्याप तरी काही विषयच नाही. शासनाची योजना आल्यानंतर इलेक्‍ट्रिक गाड्यांचा विचार करण्यात येईल.

- पी. शिवशंकर, आयुक्‍त, सोलापूर महापालिका

बातमीदार : प्रमिला चोरगी

loading image
go to top