
मोहोळचे तहसीलदार बेडसे-पाटलांची चौकशी
सोलापूर - जिल्हा प्रशासन सध्या विभागीय आयुक्त स्तरावरील चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून, मंगळवारी मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे- पाटील यांच्या चौकशीसाठी अकरा अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी मोहोळमध्ये दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
या पथकात तीन उपजिल्हाधिकारी, एक प्रांत अधिकारी, दोन नायब तहसीलदार अशा अकरा अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. उपविभागीय आयुक्त कार्यालयातून चौकशी सुरू आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना विचारले असता त्यांनीही याबाबत दुजोरा दिला.
मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे- पाटील यांच्या कार्यपद्धतीवरून सामाजिक कार्यकर्ते संजीव खिलारे यांनी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी केल्या होत्या. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्यांनी यापूर्वी आंदोलनही केले होते. तर दुसरीकडे सोलापूरचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांची भूसंपादनच्या कामात जमीन मालकाला जादा मोबदला दिल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बसवेश्वरनगर येथील भूसंपादन कामात तीन कोटी ४६ लाख ९ हजार २३३ रुपये मूल्यांकन होते, मात्र जमीन मालकाला पाच कोटी ७८ लाख ७४ हजार ६३९ रुपये देण्यात आले. यावरून सामाजिक कार्यकर्ते संदीप शितोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून याबाबतची माहिती विभागीय आयुक्तांनी मागवली आहे.
Web Title: Investigation Of Tehsildar Bedse Patal Of Mohol
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..