esakal | आता जिन कचरा यांत्रिक सिस्टीम करणार कापसातील बोंडअळी समूळ नष्ट !

बोलून बातमी शोधा

Worm
आता जिन कचरा यांत्रिक सिस्टीम करणार कापसातील बोंडअळी समूळ नष्ट !
sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : कापूस जिनिंग उद्योगातील कचऱ्यामधून गुलाबी बोंडअळीचा नाश व त्याचा प्रसार रोखण्यासाठी जिन कचरा यांत्रिकी उपचार प्रणाली विकसित करण्यात आली आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, मुंबई (आयसीएआर) व सिरकॉट यांनी संयुक्तपणे ही प्रणाली विकसित केली आहे.

कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीची समस्या गंभीर आहे. कापसावरील ही एक भयावह कीड आहे. यामुळे कापसाच्या प्रतीवर, रुईच्या उताऱ्यावर व कताई गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. याच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी व जिनिंग उद्योजकांच्या उत्पादनावर होतो. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात आणि तेलंगण या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा उद्रेक झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Pandharpur Elections : सतराव्या फेरीअखेर आवताडे आघाडीवर

कापसाच्या शेताप्रमाणेच जिनिंग उद्योगसुद्धा बोंडअळीची पुनर्निर्मिती आणि प्रसार होण्यासाठी तितकेच जबाबदार आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची चिंता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या उद्योगात जिनिंग आणि सफाई यंत्रातून कापूस प्रक्रिया केल्यानंतरही गुलाबी बोंडअळी जिवंत राहण्याची संभावना असते. जिवंत राहिलेल्या व मेलेल्या अळ्या या सायक्‍लोनमधील कचरा, पूर्व सफाई यंत्र कचरापेटी व रुई सफाई यंत्र कचरापेटीत जमा होतो. अशा कचऱ्याची काळजीपूर्वक विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. या उद्योगापासून बोंडअळीचा होणारा प्रसार रोखण्यासाठी कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाची कलर ग्रेड सुद्धा कमी होते. अतिसूक्ष्म इलेक्‍ट्रॉन सूक्ष्मदर्शीखाली असा कापूस पाहिला असता त्यावर सूक्ष्म जंतूंची वाढ झालेली दिसून येते. त्यावर बोंडअळीच्या मलमूत्राचे डाग दिसतात. तंतूच्या कडा तुटलेल्या दिसतात. त्यामुळे तंतूची ताकद कमी होते. या सर्व गोष्टींचा परिणाम कापसाची प्रत ढासळण्यावर होतो.

हेही वाचा: गटविकास अधिकाऱ्याची माणुसकी ! स्वत: सरण रचून केला कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार

या उद्योगातील बोंडअळीचा प्रसार रोखण्यासाठी तिचे जीवनक्रम तोडून पुढील हंगामातील कापसाचे नुकसान टाळण्यासाठी जिनिंग उद्योगातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी ती चिरडून टाकण्याच्या उद्देशाने जिन कचरा प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

असे कार्य करते जिन कचरा यांत्रिकी प्रणाली

या प्रणालीची एका तासात अडीच टन कचऱ्यावर उपचार करण्याची क्षमता आहे. सेन्ट्रीफ्युगल कचरा पंखा, सायक्‍लोन व कॉम्पॅक्‍टर हे या प्रणालीचे मुख्य भाग आहेत. सेन्ट्रीफ्युगल पंख्यामध्ये कचरा चिरडला जातो. हा पंखा यू. एस. डी. ए., अमेरिका यांनी निश्‍चित केलेल्या नियमांनुसार बनविला असल्यामुळे कचरा पंख्यातून बाहेर फेकला जाताना त्यातील बोंडअळ्या चिरडून नष्ट होतात. सायक्‍लोनचा वापर हवा आणि चिरडलेला कचरा वेगळा करण्यासाठी व वायू प्रदूषण कमी करण्यासाठी होतो.कॉम्पॅक्‍टरमुळे चिरडलेल्या कचऱ्याची घनता कमी होऊन त्याची प्रभावीपणे विल्हेवाट लावण्यास मदत होते.

जिन कचरा यांत्रिकी प्रणालीमुळे बोंडअळीचे जीवनचक्र जिनिंग उद्योगापासून तोडण्यास मदत होते. बोंडअळी नष्ट झाल्यामुळे त्याचा प्रसार रोखला जातो. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातील व कापसाच्या गुणवत्तेतील घट टाळता येते. गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी जिनिंग उद्योगामध्ये ही प्रणाली अनिवार्य करायला हवी.

- डॉ.विष्णू आरुडे,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई