महिलांनो सावधान! दागिने सांभाळा, सोलापुरात पुन्हा चेन स्नॅचिंग; CCTV नसलेल्या ठिकाणच्या दोन घटना

गाडी अडवून सॉरी म्हणत दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याची घटना १८ मे रोजी घडली होती. त्याचा तपास सुरु असतानाच रविवारी जेवण करून शतपावली करायला गेलेल्या ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातून गंठण हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.
तीन महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग
तीन महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंगESAKAL

सोलापूर : दुचाकीवरून घराकडे जाताना एका महिलेची गाडी अडवून सॉरी म्हणत दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना १८ मे रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास उद्धव नगर परिसरात घडली होती. त्याचा तपास सुरु असतानाच आता रविवारी (ता. २१) जेवण करून शतपावली करायला गेलेल्या ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातून मिनी गंठण हिसकावून नेल्याची घटना कंबर तलावाजवळ घडली आहे. त्यामुळे महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

हुतात्मा स्मृती मंदिरातील कार्यक्रम संपल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या सरिता अंकुशे (रा. रेणुका नगर, सैफुल) यांची गाडी विजयपूर रोडवरील उद्धव नगर परिसरात आली. त्याठिकाणी थोडासा अंधार होता आणि लोकांची वर्दळ देखील खूपच कमी होती.

अशा ठिकाणी सरिता अंकुशे यांच्या दुचाकीला दोन अनोळखी तरूणांनी दुचाकी आडवी लावली. त्यानंतर ‘सॉरी’ म्हणत दुचाकीवरील मागे बसलेल्या तरुणाने सरिता यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसका मारला. हातात मंगळसूत्र आल्यावर तत्काळ त्या दुचाकीस्वारांनी तेथून पोबारा केला. पोलिसांकडून त्या संशयितांचा शोध अद्याप सुरुच आहे. त्याच दरम्यान, रविवारी जेवण झाल्यानंतर नातीसोबत शतपावली करायला गेलेल्या बसव्वा गिरमल्ला कलमाडी (रा. वसंत नगर रोड, विजयपूर रोड) या कंबर तलावाजवळ आल्या होत्या.

त्याचवेळी समोरून दोन अनोळखी तरुण पांढऱ्या दुचाकीवरून त्याठिकाणी आले. त्यातील मागे बसलेल्याने बसव्वा यांच्या गळ्याला नख मारला. त्याचवेळी त्याने त्यांच्या गळ्यातील मिनी मंगळसूत्र हिसकावले आणि ते दोघेही तेथून काही क्षणात विजयपूर रोडने पुढे पसार झाले. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास केटरिंग कॉलेजमागे हा प्रकार घडला. या प्रकरणी बसव्वा कलमाडी यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीला आता गुन्हे शाखा देखील संशयितांचा शोध घेत आहे, पण त्यांना अद्याप यश आलेले नाही.

‘सीसीटीव्ही’चा अंदाज घेऊन चोरट्यांचा डाव

पाच-सहा दिवसांत घडलेल्या दोन चेन स्नॅचिंग घटनांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने अंधाराच्या ठिकाणी चोरले आहेत. विशेष म्हणजे त्या परिसरात तथा रोडवर सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाहीत, तेथे कोणत्या वेळेत वर्दळ कमी असते या बाबींचा अभ्यास करूनच डाव साधल्याची शंका आता उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करूनही काहीच बदल झाल्याचे दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com