रजा बंद; कोरोनाचा मुकाबला सुरू 

रजा बंद; कोरोनाचा मुकाबला सुरू 

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जिल्ह्यातील नागरिकांना पत्रकार परिषदेद्वारे केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्त यांचा व्हीसीद्वारे आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देताना नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. शंभरकर म्हणाले, आपल्या जिल्ह्यात एकही रुग्ण बाधित नाही. सगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. दोन ठिकाणी कंट्रोल रूमची उभारणी केली आहे. आज या विषयाशी संबंधित हॉटेल चालक, मॉलचालक, चित्रपटगृह चालक, ट्रॅव्हल्स एजन्सी यांची बैठक घेतली. त्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करण्याचे कबूल केले असल्याचेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील 22 वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये कोरोनाशी संबंधित उपचार करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. जे लोक चीन, दक्षिण कोरिया, इराण, इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनी या देशातून आले आहेत, त्यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय इतर देशातून आलेल्या नागरिकांची तपासणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांच्या नातेवाइकांसाठीही केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी सर्व प्रकारचा औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. या रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले. कोणत्याही आस्थापनेने आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा शाळांनी विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 

देवडीचा रुग्ण घरी 
देवडी (ता. मोहोळ) येथील रुग्ण मागील तीन-चार दिवसांपूर्वी परदेशातून आला आहे. तो आज छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आला होता. मात्र, त्याच्यामध्ये कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे त्या रुग्णाची तपासणी करून त्याला घरी पाठविले. त्या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com