खर्चासाठी पत्नीला मंगळसूत्र मागणाऱ्या मुलाने केला वडिलाचा खून! साक्षीदार फितूर, पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News
खर्चासाठी पत्नीला मंगळसूत्र मागणाऱ्या मुलाने केला वडिलाचा खून! साक्षीदार फितूर, पण...

खर्चासाठी पत्नीला मंगळसूत्र मागणाऱ्या मुलाने केला वडिलाचा खून! साक्षीदार फितूर, तरीपण...

सोलापूर : खर्चासाठी बायकोचे मंगळसूत्र मागणाऱ्या पोराला वैतागून त्याच्या वडिलांनी सुनेला घराबाहेर पाठवले. त्या रागातून मुलगा मल्लिनाथ ऊर्फ पप्प्या रामचंद्र बनसोडे (वय ३२, रा. भीमनगर, वागदरी, ता. अक्कलकोट) याने काठी व दगडाने मारून वडिलाचा खून केला. या प्रकरणी त्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. भोसले यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी मल्लिनाथ हा त्याची पत्नी ऐश्वर्या, आई शांताबाई व वडील रामचंद्र यांच्यासह वागदरीत राहात होता. पैशाच्या कारणातून मल्लिनाथ हा घरात नेहमीच वाद घालत होता. १२ ऑगस्ट २०१९ रोजी मल्लिनाथची आई मजुरीसाठी बाहेर गेली होती. दुपारी दीडच्या सुमारास मल्लिनाथ हा खर्चासाठी पैसे नाहीत म्हणून बायकोकडे मंगळसूत्र मागत होता. त्यावेळी मल्लिनाथच्या वडिलांनी ऐश्वर्याला घराबाहेर पाठवले. त्यानंतर चिडलेल्या मल्लिनाथने ‘माझ्या बायकोला घराबाहेर का पाठवले’ म्हणून वडील रामचंद्र यांना काठीने मारहाण केली. काहीवेळाने ऐश्वर्या व मल्लिनाथचा चुलता अशोक बनसोडे यांनी सोडवासोडवी करीत हातातील काठी काढून घेतली. त्यानंतर मल्लिनाथने दरवाजाला लावलेला दगड घेऊन वडिलाच्या डोक्यात घातला. डोक्यात जबर मार लागल्याने रामचंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृताची पत्नी शांताबाई यांनी मुलाविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मल्लिनाथला अटक केली. तत्कालीन पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. महेश सोलनकर यांनी काम पाहिले. कोर्टपैरवी म्हणून पोलिस शिपाई अजित सुरवसे यांची मदत झाली.

साक्षीदार झाले फितूर; फॉरेन्सिक रिपोर्ट ठरला महत्त्वाचा

मुलाने वडिलाचाच खून केल्याच्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यावर दहापैकी वैद्यक अधिकारी व तपास अधिकारी वगळता उर्वरित सर्वच साक्षीदार फितूर झाले. सरकार पक्षाने त्यांना फितूर घोषित केल्याने न्यायालयाने उलट तपास करण्यास परवानगी दिली. आरोपीची आई व चुलता यांनी उलट तपासणीवेळी महत्त्वाची कबुली दिली. दुसरीकडे, आरोपीच्या कपड्यावरील रक्ताचे डाग व मृताचा रक्तगट एकच असल्याचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल यावेळी महत्त्वाचा ठरला. दरम्यान, खुनावेळी आरोपी हा घटनास्थळी असतानाही त्याने रामचंद्र यांचा खून कोणी केला, आरोपीच्या कपड्यावर मृताच्या रक्ताचे डाग कसे आले, यावर आरोपी मल्लिनाथला काहीच उत्तर देता आले नाही. सरकारी वकील गंगाधर रामपुरे यांचा युक्तिवाद व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. भोसले यांनी आरोपीला जन्मठेप ठोठावली.