
तलाठ्याचे सज्जा कार्यालय स्वत:च्या घरात; १०,००० लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
सोलापूर : दहीवलीचे (ता. माढा) तलाठी सहदेव शिवाजी काळे यांना राहत्या घरी शेतकऱ्याकडून १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. १३) रंगेहाथ पकडले. तलाठी घराबाहेर लाच घेत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
शेतजमीन विभक्त (खातेफोड) करून वेगवेगळे सातबारा उतारे देण्यासाठी तलाठी सहदेव काळे याने तक्रारदाराकडे ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यामधील पहिला हफ्ता म्हणून १० हजार सोमवारी देणार असल्याचे तक्रारदाराने सांगितले होते. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे दोघांमध्ये निश्चित झाले होते. पण, तक्रारदाराने तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेतली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहानिशा करून सापळा रचण्याचे नियोजन केले.
पण, आपल्याविरूद्ध अशी कारवाई होऊ शकते, याचा अंदाज नसलेल्या तलाठ्याने तक्रारदाराला पैसे घेऊन त्याच्या घरीच बोलावले होते. तक्रारदाराने दहा हजार रुपये देताच तेथे दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठ्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरूद्ध कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्याला उद्या (मंगळवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस अंमलदार पकाले, जाधव, सण्णके, सुरवसे यांच्या पथकाने पार पाडली.
स्वतःच्या निवासस्थानीच सज्जा कार्यालय
माढा तालुक्यातील दहीवली गावचा तलाठी सहदेव काळे (वय- ५४) याच्याकडे तक्रारदार शेतकऱ्याने शेतजमीन विभक्त करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी तलाठ्याने तक्रारदाराकडे तब्बल ३५ हजार रुपयांची लाच मागितली. कमी पैशात होत असतानाही तलाठ्याने एवढी मोठी रक्कम मागितल्याने वैतागलेला तक्रारदार थेट ‘लाचलुचपत’च्या कार्यालयात आला. त्यांनी तलाठ्याविरूद्ध तक्रार दिली. नियोजित प्लॅननुसार तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. विशेष म्हणजे तलाठी सहदेव काळे याचे सज्जा कार्यालय दहिवलीत असतानाही त्याने कुर्डवाडीतील त्याच्या राहत्या घरीच कार्यालय थाटल्याचे त्यावेळी दिसून आले.