Agitation : महाराष्ट्र दिनी भरपाईसाठी प्रहारचे प्रांत कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation

नुकसान भरपाई देण्यास महापारेषण कंपनीने टाळाटाळ केल्याने प्रहार संघटनेने प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी अर्धनग्न आंदोलन केले.

Agitation : महाराष्ट्र दिनी भरपाईसाठी प्रहारचे प्रांत कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

मंगळवेढा - तालुक्यातील भाळवणी येथील 132 के. व्ही. उपकेंद्रासाठी टाकलेल्या विद्युत वाहिनीचा टॉवर व त्या टॉवरच्या तारेखालील खालील झाडाची नुकसान भरपाई 2018 देण्यास महापारेषण कंपनीने टाळाटाळ केल्याने अखेर प्रहार संघटनेने प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी अर्धनग्न आंदोलन केले.

या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिले, रोहिदास कांबळे, राहुल खंडेकर बाधित शेतकरी अशोक पवार, अर्जुन पवार, विठ्ठल सरवदे, तानाजी, खोमनाळचे उपसरपंच धनाजी ढेंबरे, नानासाहेब नागणे, आनंद कोडग, आण्णा पाटील, विलास कोडग, अशोक भालेराव, संतोष कलुबर्मे, पांडुरंग वाकडे, मनोहर कोडग, बाळू खांडेकर, सुरेश ढेंबरे, वंदना ढेंबरे, संतोष पांढरे, चरणदास सरवदे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

या उपकेंद्रासाठी खोमनाळ, फटेवाडी, भाळवणी या भागात महापारेषण कंपनीच्या 2013 पासून उभारण्यात आलेले वीज टॉवर व त्या खालील नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे. महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सधन लोकांना नुकसानभरपाई दिली. पण गरीब शेतकऱ्यांना त्या मोबदल्यापासून वंचित ठेवले. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवरचे काम चालू असताना पोलीस बंदोबस्त लावून या अधिकाऱ्यांनी काम करून घेतले.

मोबदल्यासाठी अडवणूक केल्यावर शेतकऱ्यांना काम संपताच मोबदला देऊ असे सांगितले होते. ते शेतकरी 2018 पासून आज पर्यंत मोबदल्यासाठी धडपडत आहेत. यासाठी 2018 साली पंचनामे झाले तेव्हापासून आज तागायत शेतकरी वंचित राहिला. तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आ. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सातत्याने आक्रमक भूमिका घेत न्याय मिळवून दिला. यामध्ये महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी केलेला घोटाळा प्रहार संघटना लवकरच उघड करणार आहे.

या आंदोलनापुर्वी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर प्रांत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तर महापारेषनचे अधिकारी शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा ऐकून घेत नाहीत. यामुळे या आंदोलनाची तीव्रता प्रहारच्या माध्यमातून वाढवणार असून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे.

- समाधान हेंबाडे, तालुकाध्यक्ष प्रहार