esakal | ...तरच ग्रामीण भागातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बसेल आळा

बोलून बातमी शोधा

Corona
...तरच ग्रामीण भागातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बसेल आळा
sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तरीदेखील नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या "कोरोना दक्षता समित्या' नुसत्या नावापुरत्याच व कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये परगावाहून अथवा इतर जिल्ह्यांतून एखादी व्यक्ती रात्री-अपरात्री गावात गुपचूप आल्यास त्या व्यक्तीवर या समितीचे बारकाईने लक्ष असायचे. अशा व्यक्तीला तातडीने विलगीकरण कक्षात ठेवले जायचे. तसेच एखाद्या भागात अथवा वाड्या-वस्त्यांवर कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्या व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांची तातडीने कोरोना चाचणी घेतली जात असायची. संपर्कातील व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तरीदेखील त्या व्यक्तींना गृह विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवले जायचे. गावात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ही समिती रात्रंदिवस झटायची. परिणामी ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यास, कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यात मोठे यश यायचे व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत नसायचा. त्यामुळे या समितीचा आरोग्य प्रशासन, पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य होत होते.

हेही वाचा: डॉक्‍टरचा दिलदारपणा ! उद्‌घाटनापूर्वीच दिले हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी

परंतु, हळूहळू जसे लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले तशी ही समितीही फक्त कागदावरच राहिली गेली. काही ठिकाणी "कोरोना प्रतिबंधात्मक समितीचा' गौरव करण्यात आला तर काही ठिकाणी केलेल्या या कार्याबद्दल शाबासकीची थाप देखील कुणी दिली नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने ग्रामीण भागात वाढत चालला आहे. कोरोना रुग्ण आढळल्यास, त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी होतेच असे नाही. तर दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह परंतु गृह विलगीकरण कक्षातच असलेल्या रुग्णांवर कुणाचाही धाक नाही. संचारबंदी असून देखील गावोगावी, चौकाचौकात नागरिकांच्या गप्पांच्या मैफली रंगत आहेत. तसेच सध्या या महामारीच्या काळात शहरी भागातून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू आहे. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता आहे. परंतु याकडे ग्रामस्तरावर कुणीही लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत नाही.

पोलिसांची गाडी गावात आल्यास तेवढीच तात्पुरती सामसूम दिसते. नंतर जैसे थे परिस्थिती असते. ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी नागरिकांना विनंती करताना दिसतात. परंतु पाहिजे तितका प्रतिसाद त्यांना मिळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन गावोगावच्या ग्राम आपत्ती समित्या पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे. यामध्ये सामाजिक तरुण कार्यकर्त्यांचा समावेश करण्याची आवश्‍यकता असून, कोरोना नियंत्रणासाठी जनजागृती करणे, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स पाळणे, अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. तरच ग्रामीण भागातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसेल.

हेही वाचा: आता आवाहन, सूचना, इशारा बंद ! थेट ग्रामपंचायत करातून होणार दंडाची वसुली

पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात देखील विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर, तसेच विनामास्क, एकत्रित जमा करून बसणाऱ्या नागरिकांवर कडक दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी केलेल्या नियमांची अंमलबजावणी करून सहकार्य करावे.

- अभिजित धाराशिवकर, पोलिस उपअधीक्षक, बार्शी

कोरोना प्रतिबंधात्मक समित्या सध्याही ग्रामीण भागात कार्यान्वित आहेत. काही ठिकाणी ग्रामस्तरावर नागरिक स्वतःहून जुमानत नसल्याचे दिसते. परंतु नागरिकांनी स्वतःहून जबाबदारी घेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी, प्रशासनाला सहकार्य करावे. पुढील काही दिवसात गेल्या वर्षी प्रमाणे "कोरोना प्रतिबंधात्मक समित्या' सक्रिय होतील.

- विजय लोकरे, प्रभारी तहसीलदार, माढा