सांगलीतील दरोडेखोर समजून पोलिसांकडून दुसऱ्याच वाहनाचा पाठलाग; त्यात निघाले अवैध दारू वाहतूक करणारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police
सांगलीतील दरोडेखोर समजून पोलिसांकडून दुसऱ्याच वाहनाचा पाठलाग; त्यात निघाले अवैध दारू वाहतूक करणारे

सांगलीतील दरोडेखोर समजून पोलिसांकडून दुसऱ्याच वाहनाचा पाठलाग; त्यात निघाले अवैध दारू वाहतूक करणारे

सोलापूर : सांगलीतील रिलायन्स सराफ दुकानात दिवसा भर दुपारी दरोडा टाकून दरोडेखोरांनी जवळपास पाच कोटींचे दागिने लुटून नेले. काही वेळातच ही घटना वाऱ्यासारखी पसली आणि पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला. सध्या सोलापूर जिल्ह्यात आठ ठिकाणी नाकेबंदी असून संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.

सांगलीतील दरोड्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांना साडेतीनच्या सुमारास कळविण्यात आली. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश देऊन नाकाबंदी करण्यात आली. ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत सर्व गावातील नागरिकांनाही त्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजेसची तपासणी देखील सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी दोन अधिकारी व आठ ते दहा पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, सोलापूर शहर पोलिसांनीही शहरात येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी लावली होती. सांगलीवरून निघालेले संशयित वाहन सोलापूरच्या दिशेने येत असल्याचा मेसेज शहर पोलिसांना मिळाला होता. पण, ते वाहन मंगळवेढा पोलिसांनी पकडल्यानंतर नाकाबंदी सैल करण्यात आली.

दरोडेखोर वाटले, पण निघाले अवैध दारूचे वाहन

दरोडेखोर पसार झालेल्या वाहनासारखे एक संशयित पांढरे वाहन सांगली पोलिसांना रस्त्यावरून जाताना दिसले. शेकडो किलोमीटर पाठलाग करताना त्या वाहनाने सांगली टोलवरील बॅरेकेडिंग तोडले होते. पोलिसांचा संशय बळावला, त्यावेळी त्यांनी सोलापूर (सांगोला) पोलिसांना त्या वाहनाची माहिती दिली. मंगळवेढा पोलिसांनी सांगोला नाक्यावर रोडवरच बॅरेकेडिंग व कंटेनर उभे करून मोठा पोलिस बंदोबस्त तेथे लावला होता. ते वाहन त्याठिकाणी मंगळवेढा पोलिसांनी पकडले, पण ते दरोडेखोर नव्हते तर अवैध दारूची वाहतूक करणारे वाहन निघाले. दरोडेखोर ना सही अवैध दारू वाहतूक करणारे तरी सापडल्याचे समाधान पोलिसांनी व्यक्त केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

दरोडेखोरांच्या शोधासाठी जिल्ह्यात कडक नाकाबंदी

सांगलीतील दरोड्यानंतर जिल्ह्यातील बार्शी, कामती, मंगळवेढा, सांगोला, मंद्रूप, अक्कलकोट, सावळेश्वर अशा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयित वाहनांची चौकशी करूनच सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. ग्रामसुरक्षा यंत्रेणेमार्फत नागरिकांनाही सूचित केले आहे.

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर