
Mohol News : चिमुरड्यांना पिण्याचे पाणी व वीज नसल्याने अंगणवाडी सेविकेने परत केला पुरस्कार
मोहोळ - अंगणवाडीत चिमूरडयांना पिण्यासाठी पाणी,विज यासह अन्य सेवा-सुविधा उपलब्ध होत नसल्याची खंत सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून ही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रामहिंगणी, ता. मोहोळ येथे कार्यरत असणाऱ्या सेविका सुवर्णा मधुकर पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने प्राप्त झालेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार सन्मानाने परत केला.
या संदर्भात अधिक माहीती अशी की, रामहिंगणी हे अंदाजे एक हजार लोकसंख्येच गाव आहे.या गावात दोन अंगणवाड्या आहेत. मात्र मागील सूमारे दहा वर्षापासून बालकांना पिण्यासाठी पाणी नाही, वीज नाही, बालकांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध नाही.अशा अनेक समस्या आहेत. या बाबत सातत्याने पाठपुरावा करूनही स्थानिक स्तरावरून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अंगणवाडीत लाईट फिटिंग चालू स्थितीत असून ही विद्युत पुरवठा नाही.
अशा अनेक समस्या आहेत.मागील तीन वर्षापूर्वी बालकांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे म्हणून जलशुद्धीकरण यंत्रणा आणली आहे. मात्र त्याच्या फक्त टाक्याच बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजतगायत मुलांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. लाईट फिटिंग केली आहे पण वीज कनेक्शन न दिल्याने विद्युत पूरवठा बंदच आहे. गावातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन गावातच मिळावे यासाठी मशीन आणली आहे. मात्र अद्यापही ती चालू केली नाही.
बालकांना पिण्यासाठी पाणी नाही मग मला दिला जाणारा राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार घेऊन काय करू? म्हणुन सन्मानाने परत केला आहे.
बालकांना पिण्याच्या पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही विचार होत नसेल तर आपुलकीने व प्रेमाने दिला जाणारा पुरस्कार मी घेऊन काय करू? अंगणवाडीतील बालकांना पाण्याची सुविधा व वीज पुरवठा उपलब्ध करून द्या मग पुरस्कार स्विकारते असे सांगत दिला जाणारा पुरस्कार सन्मानाने परत केला. आज अखेर पर्यंत अंगणवाडी आयएसओ मानांकन प्राप्त साठी अतोनात प्रयत्न करून अंगणवाडी आयएसओ मानांकन केली, सोलापूर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
दरम्यान याची दखल घेऊन गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे , बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी भेट गावाला भेट दिली व समस्याचे निराकरण केले जाईल असे आश्वासित केले.