
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या कडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेस मोहोळ तालुक्यात उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.
HSC Exam : 'परीक्षा दालनात विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास थेट पर्यवेक्षकावरच कारवाई'
मोहोळ - माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या कडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेस मोहोळ तालुक्यात उत्साही वातावरणात प्रारंभ झाला असून, या परीक्षेसाठी मोहोळ तालुक्यातून एकूण 2 हजार 494 विद्यार्थी बसले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी यांनी दिली.
इयत्ता बारावीच्या परीक्षेत मंगळवार पासून प्रारंभ झाला आहे. या परीक्षा 21 मार्च पर्यंत म्हणजे तब्बल एक महिना चालणार आहेत. मोहोळ तालुक्यातील एकूण पाच केंद्रावर ही परीक्षा सुरू झाली आहे. त्यात कामती बुद्रुक, अंकोली, अनगर व मोहोळ शहरातील दोन केंद्रांचा समावेश आहे. चालू वर्षी आज पर्यंतच्या परीक्षा पद्धतीपेक्षा वेगळी पद्धत शासनाने अवलंबली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हाधिकारी यांनी चालू वर्षी कडक धोरण स्वीकारले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पाच सदस्यीय बैठे पथक तैनात केले असून, तहसीलदार यांच्या अधिपत्या खाली दोन भरारी पथके तैनात केली आहेत.
चालू वर्षी जी बैठे व भरारी पथके नेमली आहेत त्यात प्रथमच तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, अशावर्कर यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, दोन अधिकारी व चार पोलीस कर्मचारी केंद्रनिहाय गस्त घालणार आहेत. परिरक्षक कार्यालयासाठी 24 तास दोन हत्यारी पोलीस तैनात केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
परिरक्षक कार्यालय नागनाथ विद्यालयात असून, परिरक्षक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विकास यादव व उपपरिक्षक म्हणून हनुमंत बनसोडे यांची नियुक्ती केली आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका केंद्रावरून ने आण करण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी एक स्वतंत्र "रणर" ची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती यादव यांनी दिली.
परिक्षेस बसलेले केंद्रनिहाय विध्यार्थी पुढील प्रमाणे -
कामती बु॥ - 339
अंकोली - 399
अनगर - 347
नागनाथ विद्यालय मोहोळ - 912
देशभक्त संभाजीराव गरड विद्यालय - 497