
Online Cheating : 'मी बँक ऑफ इंडिया कडूनच बोलतोय' अशी थाप मारून एका शिक्षकाची ऑनलाईन फसवणूक
Mohol News - 'मी बँक ऑफ इंडिया कडूनच बोलतोय' असे सांगून बँकेच्या सर्व व्यवहाराची "स्क्रीन कास्ट" माहिती घेऊन एका शिक्षकाची एक लाख 12 हजार 400 रुपयाची फसवणूक केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथील जिल्हा पारिषद शाळेत घडली.
या संदर्भात मोहोळ पोलीसाकडुन मिळालेल्या माहिती नुसार, रमेश लक्ष्मण दास वय 52 व्यवसाय नोकरी (जिल्हा परिषद शिक्षक) रा. चंद्रलोक सोसायटी मोहोळ हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सय्यद वरवडे ता. मोहोळ या ठिकाणी शिक्षक म्हणून मागील 10 वर्षापासुन नोकरीस आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सय्यद वरवडे च्या शाळेचा मुख्याध्यापक पदाचा पदभार जुन 2016 ते ऑगस्ट 2019 पर्यंत दास यांच्याकडे होता.
सन 2019 साली शाळेत नवीन मुख्याध्यापकाची नियुक्ती झाल्याने रमेश दास यांच्याकडील मुख्याध्यापक पदाचा पदभार त्यांचेकडे देण्यात आला होता.
परंतु दास हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहार योजनेसाठी शाळेच्या बँक खाते क्रमांकाला मुख्याध्यापक या नात्याने दास यांचा मोबाईल क्रमांक लिंक होता.
शाळेच्या पोषण आहार योजने मार्फत बँक खात्यावर जी रक्कम जमा होत होती, अगर काढली जात होती त्याबाबत दास यांना त्यांच्या मोबाईल नंबरवरच मेसेज येत होते.
ता. 17 जानेवारी 23 रोजी दास यांनी वैयक्तीक बँक खात्याची माहीती घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर मोबाईल क्रमांकावरून फोन केला असता, समोरून बोलणा-या व्यक्तीने मी स्टेट बँक ऑफ इंडीया कडूनच बोलत आहे, असे सांगुन दास यांच्या कडुन खाते क्रमांक तसेच बँकेचे सर्व डीटेल्स त्याने 'स्क्रीन कास्ट' करून काढून घेतले.
ता. 17 जानेवारी 23 रोजीपासुन ता. 21 जानेवारी 23 पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सय्यद वरवडेच्या करंन्ट बँक खाते क्रमांकाला लिंक असलेल्या दास यांच्या मोबाईल नंबर वरून एक लाख 12 हजार 400 रुपये काढुन घेतले.
या संदर्भात दास यांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या हेल्पलाईन क्रमांकाच्या व त्यावरून बोलणा-या अनोळखी व्यक्तीच्या विरूध्द मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे.तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.