
Mohol Crime : जेवणासाठी कामगारानेच केला कामगाराचा खून
मोहोळ - तयार केलेले जेवणही देत नाही, व जेवण तयार करण्यासाठी भांडीही देत नाही या कारणावरून एका कामगाराने दुसऱ्या कामगाराचा लाकडाने मारून खून केल्याची घटना सोमवार ता 29 रोजी सकाळी पावणेसात वाजण्याच्या पूर्वी पाटकुल ता मोहोळ येथे घडली. कृष्णा निसाद रा छत्तीसगड असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पुखराम सिताराम निसाद रा. छत्तीसगड याला पोलिसांनी अटक केली आहे.
मोहोळ पोलिसा कडून मिळालेल्या माहिती नुसार, पाटकुल ता मोहोळ येथील विश्वजीत वीरसेन देशमुख वय 24 यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्या कामावर विट काम करण्यासाठी कृष्णा निसाद व पुखराम सिताराम निसाद दोघे ही रा छत्तीसगड हे देशमुख यांच्याकडे मुक्कामी होते. दरम्यान सोमवारी सकाळी पावणे सात वाजता विश्वजीत यांची चुलती जोसना देशमुख यांनी विश्वजीत यास फोन केला व त्या फोनवरून साहेब मी वुखराम बोलत आहे, आपण लवकर बांधकामावर या असे सांगितले.
त्यावेळी विश्वजीत हा बांधकामावर गेला असता पुखराम हा खूप घाबरला होता. त्याला काय झाले असे विचारले असता कृष्णा ला कोणीतरी मारले आहे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे असे सांगितले. विश्वजीत याने आत जाऊन पाहिले असता लोखंडी कॉटवर रक्ताच्या थारोळ्यात कृष्णा पडला होता. विश्वजीतने सर्व नातेवाईकांना बोलावून हा प्रकार सांगितला पुखराम हा त्यावेळी बिथरल्या सारखा झाला होता.
या पूर्वीही त्या दोघांची कामावर असताना शिवीगाळ व एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार होत होते. संशय आल्याने विश्वजीत व त्याच्या नातेवाईकाने पुखराम याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने कृष्णा मला जेवण ही देत नव्हता व जेवण तयार करण्यासाठी भांडीही देत नव्हता म्हणून रागात येऊन मी त्याला लाकडाने मारल्याचे पुखराम याने सांगितले. या प्रकरणी विश्वजीत वीरसेन देशमुख यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून, संशयित पुखराम निसाद याला मोहोळ पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुनगे हे करीत आहेत.