esakal | मुंबई - हैद्राबाद नियोजीत बुलेट ट्रेनचा मार्ग बदलू देणार नाही- निंबाळकर । Bullet Train
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-हैद्राबाद नियोजीत बुलेट ट्रेनचा मार्ग बदलू देणार नाही

मुंबई-हैद्राबाद नियोजीत बुलेट ट्रेनचा मार्ग बदलू देणार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात भर घालणाऱ्या मुंबई - हैद्राबाद या नियोजित बुलेट ट्रेनच्या मार्गात कोणताही परिस्थितीत बदलू होऊ देणार नाही. प्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात जन आंदोलन उभा करु, असा इशारा माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिला आहे.

उजनी पाणी प्रश्ना नंतर आता बुलेट ट्रेनसाठी सोलापूर जिल्ह्यातून राज्य सरकार विरोधात आंदोलन उभारले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं सरकारने मुंबई - हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजूरी दिला आहे. हा मार्ग पुणे, सातारा,सोलापूर मार्ग पुढे कर्नाटतून आंध्रप्रदेशातील हैद्राबाद या मेट्रोसिटी पर्यंत जोडण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.

हेही वाचा: पुणे : म्हणून 'कात्रजचा खून झाला'; आता व्हिडिओ व्हायरल

अंतराच्या आणि आर्थिक बचतीच्या दृष्टीने हा मार्ग परवडणारा आहे. त्यामुळे या मार्गाचा सर्हे देखील पूर्ण झाला आहे. हा मार्ग अंतिम टप्प्यात आलेला असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हा मार्ग मराठवाड्यातून नेण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे य़ांनीही या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. त्यानंतर या प्रकल्पा वरुन नवीन वाद आणि चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात खासदार निंबाळकर यांना विचारले असता, त्यांनी या मार्गात कोणताही बदलू होऊ देणार नाही अशी भूमिका घेत प्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले जाईल अशा इशारा दिला आहे.

त्यांच्या या इशारानंतर नियोजित प्रकल्पाविषयी नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उजनीचे पाणी इंदापूर बारामतीला देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारला रद्द करावा लागला आहे. त्यानंतर आता राज्य सरकार बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने या भागातील जनतेमधून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

हेही वाचा: पेसा क्षेत्रातील कायम राहणाऱ्यांना सवलतीचा लाभ मिळावा

याबाबत खासदार निंबाळकर म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. पालक या नात्याने समान विकास करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. उजनीचे पाणी इंदापूर बारामतीला देण्याचा घट महाविकास आघाडी सरकारने घातला होता. तो स्थानिक शेतकऱ्यांनी हाणून पाडला. पंढरपूर ते लोणंद रेल्वेमार्गाला राज्य सरकारने निधी देणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर आता बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल करुन तो मराठवाड्यातून नेण्याचा डाव आखला जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सांगण्यावरुन हे सुरु आहे.

याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बळी पडू नये. राज्याचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या दरातून ही बुलेट ट्रेन जाणार आहे. त्यामुळे देवाच्या दारातून जाणारा मार्ग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बदलणार का असा प्रश्नही खासदार निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकार जर या नियोजीत मार्गात बदल करणार असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध राहणार आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून मार्गात कोणताही बदल करु नये असे पत्र देणार असल्याचेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

loading image
go to top