आमदार प्रणितींच्या मतदारसंघावर राष्ट्रवादी अन्‌ 'एमआयएम'चा डोळा! मास्तरांचे घटले मताधिक्य

एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख, काँग्रेसचे माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे ‘एमआयएम’नेही (फारूक शाब्दी) शहर मध्य मतदारसंघात जम बसवायला सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक विजयी होणार, यावर ‘शहर मध्य’चा पुढील आमदार कोण, याचा अंदाज येणार आहे.
आमदार प्रणिती शिंदे
आमदार प्रणिती शिंदेSakal

सोलापूर : एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख, काँग्रेसचे माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे ‘एमआयएम’नेही (फारूक शाब्दी) शहर मध्य मतदारसंघात जम बसवायला सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक विजयी होणार, यावर ‘शहर मध्य’चा पुढील आमदार कोण, याचा अंदाज येणार आहे. प्रदेश कार्याध्यक्षा झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे या राज्यभर दौरा करीत आहेत, पण त्यांच्या मतदारसंघात विरोधक आपला जम बसवित असल्याची स्थिती आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी हॅट्‌ट्रिक केली आहे. पण, आता पुढच्या निवडणुकीत त्यांना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीसोबतच एमआयएमला टक्कर द्यावी लागणार आहे.

आमदार प्रणिती शिंदे
महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

जिल्ह्यात शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसचा एकमेव आमदार आहे. शहर उत्तर मतदारसंघात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्राबल्य असून, त्या मतदारसंघात सर्वाधिक नगरसेवक भाजपचेच निवडून आले. शहर मध्य व दक्षिण सोलापूर मतदारसंघातही भाजपचे नगरसेवक विजयी झाले होते. शहर मध्यच्या आमदार काँग्रसेच्या असतानाही त्याठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस मागच्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिला. आता राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसला मागे टाकून महापौरपद मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. या तिन्ही पक्षांशी भाजपचा मुकाबला असणार आहे. आपापसातील भांडणाचा मोठा लाभ भाजपला होणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकत्रित लढावे, अशी नेत्यांची अपेक्षा आहे. पण, त्यांनी सन्मान मिळावा, पक्षाची ताकद असलेले प्रभाग मिळावेत, अशी मागणी केली आहे. त्यावर कशा पद्धतीने तोडगा निघतो, यावर भाजप राजकीय डावपेच आखणार आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक कोणाचे, विशेषत: शहर मध्यमधून कोणाचे अधिक नगरसेवक विजयी होतात, यावर तेथील पुढचा आमदार ठरेल, अशी चर्चा आहे.

आमदार प्रणिती शिंदे
तरूणांसाठी खुशखबर! महाविकास आघाडी करणार एक लाख पदांची मेगाभरती

आडम मास्तरांचे कमी झाले मताधिक्य

बदलत्या राजकारणात अनेकांनी पक्षनिष्ठेची माळ खुंटीला अडकवून या पक्षातून त्या पक्षात उडी घेतली. पण, माकप नेते नरसय्या आडम यांनी पक्षनिष्ठा कायम जोपासली. मास्तरांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून २००९ पासून सलग तीनवेळा आमदारकीची निवडणूक लढविली. पण, २००९ मध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकाची ३४ हजार ६६४ मते मिळाली. त्यानंतर त्यांना पुढच्या दोन्ही निवडणुकीत १४ हजारसुद्धा मते मिळाली नाहीत. त्याला एमआयएम कारणीभूत ठरला आणि मुस्लिम मतांची त्यांची व्होट बॅंक हातून निसटली. विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलने, निदर्शने करताना मास्तरांसोबत हजारोंची गर्दी असते. पण, आमदारकीला त्यांना तेवढी मते का मिळत नाहीत, या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडलेले नाही.

आमदार प्रणिती शिंदे
पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा ‘मैदानी’च! पहिल्या टप्प्यात ७२३१ पदांची भरती

उमेदवारांच्या स्पर्धेत प्रणितींचेही घटले मताधिक्य

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे. पण, २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत एमआयएमला त्या ठिकाणी यश मिळाले नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना ६८ हजारांहून अधिक मते मिळाली, पण २०१४ च्या निवडणुकीत तौफिक शेख यांच्यामुळे त्यांचे मताधिक्य घटले आणि आमदार प्रणिती शिंदे यांना ४६ हजार ९०७ मते मिळाली. मागील निवडणुकीत फारुक शाब्दी यांनी एमआयएमकडून निवडणूक लढविली आणि त्यांनी तौफिक शेख यांच्यापेक्षा अधिक (३८,७२१) मते घेतली. त्यावेळी प्रणिती शिंदे यांना ५१ हजार ४४० मते मिळाली. आता याच मतदारसंघातील ॲड. बेरिया, तौफिक शेख हे राष्ट्रवादीत जाणार असल्याने आगामी निवडणुकीत चौथ्यांदा विजयी होण्यासाठी प्रणिती शिंदे यांना महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com