'स्थायी'वर अंबिका पाटील की मनोज शेजवाल? ! करगुळे, खरादी यांच्या भूमिकेकडे लक्ष

1_ncp_and_shiv_sena_and_bjp_vs_congress.jpg
1_ncp_and_shiv_sena_and_bjp_vs_congress.jpg

सोलापूर : महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती आज ठरणार असून त्यासाठी साडेअकरा वाजता निवडणूक प्रक्रिया सुरु होईल. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे पिठासन अधिकारी असणार आहेत. भाजपकडे आठ तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या सर्व पक्षांचे मिळून आठ सदस्य आहेत. रियाज खरादी यांनी शहराध्यक्ष व पक्ष निरीक्षकांशी चर्चा करून तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांचा विषय पक्षाचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यापर्यंत पोहचला असून खरादी यांचा मोबाइल बंद असल्याने त्यांच्याशी जलिल यांचा संपर्कच होऊ शकला नाही.

सर्वच पक्षांनी काढला व्हीप 
स्थायी समितीसाठी नऊ सदस्यांची गरज लागणार असून भाजपकडे आठ सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या सर्व पक्षांचे मिळून आठ सदस्य आहेत. यापूर्वी सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मतदान करण्यापूर्वीच निवड प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र, ज्याठिकाणी मतदान प्रक्रिया थांबली, तिथून पुढे प्रक्रिया व्हावी, असे न्यायालयाचे आदेश असून त्यासाठी आम्ही आग्रही असल्याची भूमिका सत्ताधारी भाजपने घेतली आहे. दुसरीकडे भाजप व एमआयएमनेही आपापल्या सदस्यांना व्हीप काढला आहे. 

सत्ताधारी भाजपला स्थायी समिती मिळू नये, म्हणून विरोधकांनी राजकीय जुळवाजुळव केली. मात्र, रियाज खरादी यांची भूमिका अस्पष्ट असून वैष्णवी करगुळे यांची नाराजी अजून दूर झालेली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांच्याविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून ते उपस्थित राहतील की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. भाजपने मात्र, सावध पवित्रा घेत आमदार सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सदस्यांची नाराजी दूर केली आहे. भाजपच्या आठ सदस्यांपैकी कोणी तटस्थ राहू नये अथवा विरोधात मतदान करू नये म्हणून सर्वच सदस्यांना व्हीप बजावला आहे. तर नूतन गायकवाड यांनी खरादी यांना व्हीप काढून शिवसेनेच्या स्थायीचे उमेदवार मनोज शेजवाल तर परिवहनचे उमेदवार नितीन गायकवाड यांना मतदान करण्याची ताकीद दिली आहे. मात्र, त्यांनी पक्षाच्या निरीक्षकांची भेट घेतली असून आपण तटस्थ राहणार असल्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. रविवारी (ता. 14) खरादी हे नॉट रिचेबल होते. त्यामुळे ते मतदानासाठी उपस्थित राहतात की नाही, याची उत्सुकता लागली असून महाविकास आघाडीला त्याची चिंता लागली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील धुसपूस पाहून भाजपचा विजय निश्‍चित मानला जात आहे. 

स्थायीचा सभापती ठरविणार परिवहनचा सभापती 
परिवहन सभापतीसाठी भाजपकडून अशोक यनगंटी यांना उमेदवारी दिली जाणार आहे. तर महाविकास आघाडीतून शिवसेनेचे नितीन गायकवाड यांची उमदेवारी फिक्‍स आहे. भाजप व महाविकास आघाडीकडे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापतीचे मत परिवहन सभापतीपदासाठी निर्णायक ठरणार आहे. स्थायी समितीचा सभापती ज्या पक्षाचा होईल, त्याच पक्षाचा परिवहन सभापती होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com