esakal | माळशिरसमध्ये वाजली नाही एकाही शाळेची घंटा !
sakal

बोलून बातमी शोधा

School Bell

माळशिरसमध्ये वाजली नाही आज एकाही शाळेची घंटा !

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

तालुक्‍यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 95 आहेत. आठवीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या 17 शाळा आहेत.

माळीनगर (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यात (Malshiras Taluka) एक महिन्यापासून कोरोना (Covid-19) रुग्ण नसलेली आठ गावे आहेत. मात्र या गावात आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळाच नसल्याने तालुक्‍यात एकाही शाळेची घंटा आज (सोमवारी) वाजली नाही. (No school has been started in Malshiras taluka today)

हेही वाचा: म्हारी छोरियॉं छोरों से कम हैं के..!

तालुक्‍यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 95 आहेत. आठवीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या 17 शाळा आहेत. तालुक्‍यातील वाफेगाव, बिजवडी, वटफळी, तांबेवाडी, माळेवाडी, बोरगाव, विठ्ठलवाडी, निटवेवाडी, शेंडेवाडी ही गावे एक महिनाभरापासून कोविडमुक्त आहेत. वाफेगाव वगळता उर्वरित सात गावांत माध्यमिक तसेच आठवीचा वर्ग असलेली जिल्हा परिषदेची एकही शाळा नाही. वाफेगावमध्ये माध्यमिक शाळा, वाफेगाव - बाभूळगाव नावाची विनाअनुदानित शाळा या दोन्ही गावांच्या हद्दीवर आहे. या शाळेचा 42 पट आहे. दोन्ही गावांतील प्रत्येकी 20 ते 22 मुले या शाळेत आहेत. वाफेगावमध्ये सध्या कोरोना रुग्ण नाहीत, पण बाभूळगावमध्ये आहेत. त्यामुळे ही शाळा सुरू होऊ शकली नाही.

महिनाभरापासून एकही कोरोना रुग्ण न आढळलेल्या गावातील शाळा 15 जुलैपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील कोविडमुक्त गावातील आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र शासनाच्या निकषात एकही शाळा बसली नाही. शाळा सुरू करण्यासाठी गावात कमीत कमी एक महिना कोरोना रुग्ण आढळलेला नसावा, ही जाचक अट शाळा सुरू होण्यात अडसर ठरत आहे. त्यामुळे अधिकाधिक शाळा सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

शाळा सुरू करण्याबाबत पालकांकडून सर्व्हे केला जात आहे. त्यास पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे 15 जुलैपासून कोविडमुक्त गावात शाळा सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत, दुसरीकडे मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगत आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्येच (Mahavikas Aghadi Government) शाळा सुरू करण्यासंदर्भात मेळ नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांचे डोळे धरणांकडे! यंदा केवळ एक टक्का क्षेत्रात ऊस लागवड

शाळा सुरू करण्याच्या निकषात एकही शाळा बसली नसल्याने तालुक्‍यात एकाही ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग चालू होऊ शकले नाहीत. कोविडमुक्त गावात आठवीचा वर्ग असलेली जिल्हा परिषदेची एकही शाळा नाही. वाफेगाव येथील माध्यमिक शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. बाभूळगावमध्ये कोरोना रुग्ण असल्याने तो असफल झाला.

- धनंजय देशमुख, गटशिक्षणाधिकारी, माळशिरस

loading image