
Solapur : निवडणुकीत विरोधकांना एकही जागा देणार नाही; कल्याणराव काळे
पंढरपूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याला गेल्या दोन महिन्यांपासून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांनी कितीही बदनाम केले तरी कारखान्याचे सर्वसामान्य सभासद हे आमच्या सोबत आहेत.
येत्या निवडणुकीत सभासद विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास व्यक्त करत, कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना एकही जागा दिली जाणार नाही. कुणाला मैदानात यायचं त्यांनी खुशाल यावं, असे खुले आव्हानही कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी आज (मंगळवारी) दिले. काळे यांच्या आव्हानामुळे बिनविरोध निवड प्रक्रियेला आता जवळपास खीळ बसली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी मंगळवारी (ता. १६) कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधक कारखान्याला बदनाम करत असल्याचा आरोप केला. वसंतराव काळे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विरोधी अभिजित पाटील, बी. पी. रोंगे, दीपक पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पाटील-रोंगे यांनी लक्ष घातल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यामुळे सध्या सहकार शिरोमणीच्या निवडणुकीची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.
विरोधी गटाकडून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होत असतानाच आज काळे यांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दुपारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रांत कार्यालयापर्यंत मोटारसायकल रॅली काढली. रॅलीमध्ये काळे गटाचे कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी काळे म्हणाले, जवळपास ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांची उसाची बिले अदा केली आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांचीही बिले देण्याचे काम सुरू आहे. कारखान्याला आर्थिक अडचणी आल्यामुळे विलंब झाला आहे. तरीही माझी वैयक्तिक प्रॉपर्टी बॅंकेला गहाण टाकून सभासदांच्या उसाचे पैसे दिले आहेत. तरीही विरोधक जाणूनबुजून कारखान्याविषयी अपप्रचार करत आहेत.
विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला कारखान्याचे सभासद बळी पडणार नाहीत. निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवून देऊ. दरम्यान, काळे यांच्या स्पष्टीकरणानंतर कारखान्याची निवडणूक चुरशीने होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.