सोलापूर स्थानकांच्या नावांसह आठ स्थानकावर आता झळकणार ‘ब्रँड’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Non Fair Revenue Brand to flashed eight stations names of Solapur stations Expression of interest

सोलापूर स्थानकांच्या नावांसह आठ स्थानकावर आता झळकणार ‘ब्रँड’!

सोलापूर : रेल्वे स्थानकाच्या नावापुढे आता एखादा ब्रँड किंवा कंपनीचे नाव झळकणार आहे. मध्य रेल्वेने इतर उत्पन्न (नॉन फेअर रेव्हेन्यू) प्राप्त करण्याच्या उद्देशाने रेल्वे स्थानकांचे ‘को-ब्रँडिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर विभागातील नऊ स्थानकांची यात निवड करण्यात आली असून, त्यासाठी इच्छुकांकडून ‘स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव’ (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविण्यात आले आहेत.

रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशभरातील रेल्वे स्थानकांचे ‘को-ब्रँडिंग’ केले जात आहे. याचे काम मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये सुरू झाले आहे. को-ब्रँडिंग म्हणजे स्टेशनच्या नावासोबत ब्रँडचे नाव जोडले जाईल. ‘नॉन-फेअर रेव्हेन्यू’ वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश असणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या वेबसाइटवर यासंबंधीची सर्व कागदपत्रे आदी माहिती उपलब्ध असणार आहे, तर यानंतर २१ दिवसांच्या आत निविदा स्वीकारल्या जाणार असून, त्यानंतर त्याची तपासणी होऊन को-ब्रँडिंगचे अधिकार दिले जाणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोलापूर विभागामध्ये को-ब्रँडिंगसाठी प्रस्तावित स्थानके सोलापूर, वाडी, कलबुर्गी, लातूर, पंढरपूर, दौंड, अहमदनगर, कोपरगाव आणि साईनगर शिर्डी यांचा समावेश आहे.

रेल्वेला मिळणार महसूल

‘को-ब्रँडिंग’च्या बदल्यात रेल्वेला संबंधित कंपन्यांकडून चांगला महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. एका वेळी एक ते तीन वर्षांकरिता ‘ब्रँडिंग’साठी स्थानकांचे वाटप केले जाणार आहे. या दरम्यान संबंधितांना जाहिरात फलक, होर्डिंग्जची देखभाल करण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे.

ठळक बाबी...

  • रेल्वेच्या नकाशात मूळ नावच राहणार

  • स्थानकाच्या नावाला ब्रँडचे नाव जोडल्यानंतरही वेळापत्रक, वेबसाइट, तिकिटाच्या घोषणा आणि मार्गाच्या नकाशात स्थानकाचे मूळ नावच असेल

  • एखादे स्थानक प्रदेश आणि देशातील दिग्गज व्यक्तींच्या नावाने असेल, तर त्या स्थानकाच्या नावापुढे ब्रँडचे नाव जोडले जाणार नाही

  • सोलापूर विभागातील नऊ स्थानकांची निवड

  • उत्पन्न वाढविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल

सोलापूर रेल्वे विभागातील नऊ स्थानकांची को-ब्रॅंडिंग करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. को-ब्रॅंडिंगमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर