चॉकलेटच्या बहाण्याने ३ अल्पवयीन मुलींना नेले, एकीवर केला अत्याचार; आरोपी तरुणाला २० वर्षांचा कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News
चॉकलेटच्या बहाण्याने ३ अल्पवयीन मुलींना नेले, एकीवर केला अत्याचार; आरोपी तरुणाला २० वर्षांचा कारावास

चॉकलेटच्या बहाण्याने ३ अल्पवयीन मुलींना नेले, एकीवर केला अत्याचार; आरोपी तरुणाला २० वर्षांचा कारावास

सोलापूर : घराजवळील शाळेच्या मैदानात मैत्रिणींसोबत खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने जवळील पडीक जागेत नेऊन अत्याचार केला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी आरोपी जयेश राजू ऊर्फ राजेश गायकवाड (वय २१, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. एक) याला २० वर्षे सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

दरम्यान, ९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी सव्वाएकच्या सुमारास पीडिता तिच्या दोन मैत्रिणींसोबत घराजवळील शाळेच्या मैदानात खेळत होती. त्यावेळी आरोपी राजेश दुचाकीवरून त्याठिकाणी आला. त्याने तिन्ही अल्पवयीन मुलींना चॉकलेट देतो म्हणून दुचाकीवर बसवले. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. १ येथील निर्जनस्थळी सुरु असलेल्या एका नवीन बांधकामाच्या बंद पडीक घरात नेले. दोन मुलींना बाहेर बसवले आणि एकीला आत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर वॉचमन तेथे येत असल्याचे समजातच त्याने तिघींनाही एका चौकातील भाजी मार्केटसमोर सोडून निघून गेला. पीडितेचा मामा त्याठिकाणी आला. त्यावेळी तिने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. पीडितेच्या मामाने कुटुंबीयांना त्याची माहिती देऊन पोलिसांत धाव घेतली. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यादृष्टीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी वेगवेगळ्या कलमांखाली आरोपीला चार शिक्षा ठोठावल्या.

‘पोक्सो’अंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी व आठ हजारांचा दंड ही शिक्षा देखील आरोपीला झाली. यात सरकारतर्फे ॲड. राजपूत यांनी तर आरोपीतर्फे ॲड. रेवण पाटील यांनी काम पाहिले. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त कमलाकर ताकवले यांनी गुन्ह्याचा तपास केला. तर कोर्टपैरवी म्हणून पोलिस हवालदार श्री. कोकणे यांनी मदत केली.

वॉचमनमुळे दोन मुलींवरील अत्याचार टळला

गुन्ह्यातील आरोपी राजेश गायकवाड याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तीन अल्पवयीन मुलींना दुचाकीवर बसवून घेऊन गेला. त्यानंतर दोन मुलींना चॉकलेट देऊन बाहेर बसवले आणि एकीवर अत्याचार केला. ती ओरडत असताना पीडितेला चापट मारून गप्प केले. तिन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा त्याचा हेतू होता. पण, तेथील वॉचमनने त्यांना हटकल्याने आरोपी लगेच तेथून पसार झाला. वॉचमनमुळे पुढील अनर्थ टळल्याची बाब देखील गुन्ह्याच्या तपासादरम्यान समोर आली.