विश्‍वबंधुत्वाचा संदेश देत निघाली सायकल वारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur bicycle race Launch by devendra fadnavis

विश्‍वबंधुत्वाचा संदेश देत निघाली सायकल वारी!

पंढरपूर : सायकलवरून दूरवर प्रवास अनेक जण करतात. पण दोन तीर्थक्षेत्रांना सायकल वारीने जोडण्याचा अनुभव सायकलस्वारांना येणार आहे. अशीच सायकल वारी शुक्रवारी (ता. ४) कार्तिकी एकादशीला पंढरीतून घुमानकडे मार्गस्थ झाली. टाळ मृदंगाचा गजर आणि संत नामदेव महाराजांच्या जयघोषात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपूरमधून सायकलस्वार वैष्णव शांती, समता, बंधुतेचा संदेश घेऊन घुमानकडे रवाना झाले.

भागवत धर्म प्रसारक समिती, श्री नामदेव समाजोन्नती परिषद, पालखी सोहळा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या या सायकल वारीचा उद्देश संतविचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा, हा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांनी महाराष्ट्रातून पंजाबमधील घुमानपर्यंत एकत्र वारी एकत्र केल्याचा उल्लेख आहेत.

त्या मार्गावर जाणारी ही वारी पंढरपूर-घुमान हे दोन हजार ३०० किलोमीटरचे अंतर कापणार आहे. ज्ञानेश्वर महाराज नामदास, केशव महाराज नामदास, कृष्णदास महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास, माधव महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सायकल वारीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे साडेपाच वाजता शासकीय विश्रामगृहाबाहेर झाला.

यावेळी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले, योगी निरंजननाथ, पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, संत नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजीव तुपसाखरे, सुनील गुरव, मनोज मांढरे, राजेंद्र पोरे उपस्थितीत होते.

संत नामदेव महाराजांच्या जयघोषात सायकलस्वार आणि संत नामदेव महाराजांच्या पादुकांचा रथ मार्गस्थ झाला. तत्पूर्वी मध्यरात्री पंढरीत संत नामदेव महाराज मंदिरात फडणवीस यांनी पादुकांची पूजा केली. त्यावेळी डॉ. अजय फुटाणे, सुनील नेवासकर त्यांच्यासह होते.

अशी आहे वारी

  • सायकल वारीत १२५ जणांचा सहभाग

  • ५५ हून अधिक वय असलेले ७० सायकलस्वार

  • पंढरपूर-घुमान २३०० किलोमीटरचे अंतर

  • २३ दिवसांचा प्रवास

  • महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाना, पंजाब राज्यातून वारी जाणार

  • डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार, वारकऱ्यांचा सहभाग

  • वारीचा समारोप राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या उपस्थितीत होणार

उपमुख्यमंत्र्यांकडून उपक्रमाचे कौतुक

फडणवीस म्हणाले, ‘‘घुमान सायकल वारीचा उपक्रम चांगला आहे. संत नामदेवांनी भागवत धर्म वैश्विक केला. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घुमानला गेलो होते. तेव्हा नामदेव महाराजांचा सन्मान मला पाहायला मिळाला. पंढरपूर - घुमान ही तीर्थक्षेत्र जोडण्याच्या निमित्ताने वारकरी आणि सायकलस्वार आज निघाले आहेत. नामदेव महाराजांचे कार्य, विश्वबंधुत्वाचा विचार व सर्वांना सोबत घेऊन जाणे, सहअस्तित्वाचा संदेश घेऊन हे वारकरी पंढरपूरवरून घुमानला चालले आहेत, ही चांगली बाब आहे.’’