
Nirjala Ekadashi : निर्जला एकादशी निमित्त पंढरी गजबजली
पंढरपूर - निर्जला एकादशी निमित्त दाखल झालेल्या भाविकांच्या गर्दीने बुधवारी (ता.३१) पंढरी गजबजुन गेली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यावरील एक नंबर पत्रा शेड पर्यंत गेली होती. श्रीच्या दर्शनासाठी आठ तास लागत होते.
आषाढी एकादशीच्या एक महिना आधी निर्जला एकादशी येते. निर्जला एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील हजारो भाविकांचे पंढरीत आगमन झाले होते. श्री विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदीचे वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. चंद्रभागा नदीत स्नान केल्यानंतर बहुतांश भाविक दर्शन रांगेत उभे राहत होते.
यंदाची नीर्जला एकादशी बुधवारी आल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ भाविकांना लागली असल्याने दर्शनाची रांग पत्रा शेड पर्यंत गेली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना ऊन लागू नये म्हणून मंदिर परिसर व दर्शन रांगेवर अच्छादन केले होते. दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलेले विठोबा व्यंकटी कोकाटे (रा.केनवड, ता. रिसोड जिल्हा: वाशिम) 'सकाळ' शी बोलताना म्हणाले, आम्ही कुटुंबीय पहाटे साडेतीन वाजता पत्रा शेडमध्ये मधील दर्शन रांगेत उभे होतो. आठ तासानंतर दुपारी साडेअकरा वाजता आम्हाला श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले. बुधवार विठ्ठलाला प्रिय असल्याने या दिवशी श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्याने अत्यंत आनंदित झालो आहोत.
यावर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये व निर्जला एकादशी दिवशी भाविकांचे मोठ्या प्रमाणावर आगमन झाल्याने प्रासादिक वस्तू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. याबाबत पंढरीतील ताठे अगरबत्तीचे सागर ताठे देशमुख म्हणाले, कोरोना नंतर जवळपास दररोज हजारो भाविक पंढरीत येत आहेत. त्यामुळे पंढरी मध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. भाविकांकडून विशेषतः प्रासादिक साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.