esakal | Coronavirus : कोरोनाशी मुकाबल्याचा पंढरपूर पॅटर्न
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur pattern of coping with coronas

हातात हात घालून काम करण्याची अपेक्षा 
पंढरपूर येथील अधिकाऱ्यांनी एकत्रित येत कोरोनाविरोधात जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट अशी सध्या तरी कामगिरी केली आहे. यापुढच्या काळात देखील सर्व अधिकारी एकमेकांच्या हातात हात घालून सर्वांना बरोबर घेऊन महामारी संकटावर मात करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य पंढरपूरकरांमधून व्यक्त केली जात आहे. 

Coronavirus : कोरोनाशी मुकाबल्याचा पंढरपूर पॅटर्न

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोना साथीच्या संकटाने देश आणि राज्य हादरून गेले आहे. साथीपासून सर्वसामान्य लोकांचा बचाव व्हावा यासाठी सर्वाधिक प्रयत्न हे प्रशासकीय पातळीवरून सुरू आहेत. पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्या 15 दिवसांपासून येथील प्रशासकीय अधिकारी अखंडपणे कार्यरत आहेत. पंढरपूर विभागाचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोनाची जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. 
उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे आणि विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी हे तरुण अधिकारी गेल्या 15 दिवसांपासून रात्रंदिन लोकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे पंढरपूर शहर व तालुक्‍यातील सुमारे तीन लाख नागरिक आजतरी कोरोनापासून सुरक्षित आहेत. 
गेल्या आठ दिवसांत राज्यात व देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. सातारा, सांगली, पुणे या सीमालगत असलेल्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. पंढरपूरसारख्या गर्दीच्या शहरात कधीही संकट ओढावू शकते, याचे भान ठेवून चारही अधिकारी समन्वयाने शहर व तालुक्‍यातील परिस्थिती हाताळत आहेत. 
प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख असलेले उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांच्याकडे समयसूचकात आणि नेतृत्वगुण असल्यामुळे त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित करून चांगला समन्वय ठेवला आहे. शहर व तालुक्‍यातील सर्वसामान्य लोकांशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. श्री. ढोले हे सलग 17 ते 18 तास काम करत आहेत. दररोजचे प्रशासकीय कामकाज पाहून अनेक गावांना भेटी देतात. भेटी दरम्यान आरोग्यसेवेचा आढावा घेतात. लोकांच्या दैनंदिन गरजेच्या पेट्रोल, डिझेल, शेती साहित्य, अन्नधान्य वितरण, भाजीपाल अशा जीवनावश्‍यक गोष्टी लोकांना वेळेत मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. 
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनीही शहर व तालुक्‍यातील कायद्या-सुव्यवस्था राखण्याचे मोठे जिकिरीचे काम लीलया पेलले आहे. शहर व तालुक्‍यातील चार पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन लोकांना चांगली शिस्त लावण्याचे त्यांचे काम सुरू आहे. प्रसंगी नाठाळांच्या माथी हाणू काठी याप्रमाणे त्यांनी अनेकजणांना शिस्त लावली आहे. 
नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनाही शहरातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील रस्ते निर्जंतुकीकरण करण्याचे मोठे काम नुकतेच पूर्ण केले आहे. त्यानंतर आता बॅंका आणि एटीएम सेंटर निर्जंतुकीकरणाचे काम सुरू केले आहे. बेघर, वृद्ध, अपंग लोकांची राहण्याची व भोजनाची सोय केली आहे. 
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचेदेखील योगदान मोठे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिरात त्यांनी प्रथम स्वच्छतेचे काम सुरू केले होते. सुरवातीला त्यांच्या स्वच्छतेची अनेकांनी खिल्ली उडवली होती. परंतु त्यांनी केलेल्या कामाचे नंतर कौतुक झाले. गर्दी टाळण्यासाठी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याची शिफारसदेखील त्यांनीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली होती. त्यानंतर मंदिर अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. 4 एप्रिल रोजी चैत्री वारी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चैत्री वारी रद्द करून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत दिली आहे. शिवाय, मंदिर समितीच्या वतीने दररोज शहरातील अंध-अपंग-निराश्रित लोकांना खिचडीचे वाटप सुरू आहे. 

loading image