esakal | इससे बडा पाइप लानेका है.. असे म्हणून रात्रीतून चोरून नेले पाइप!
sakal

बोलून बातमी शोधा

इससे बडा पाइप लानेका है.. असे म्हणून रात्रीतून चोरून नेले पाइप!

14 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री "मी गाडीचा आवाज झाल्याने उठून घराबाहेर आलो. त्यावेळी मला पाच ते सहा लोक महानगरपालिकेचे पाइप ट्रकमध्ये ठेवताना दिसले."

इससे बडा पाइप लानेका है.. असे म्हणून रात्रीतून चोरून नेले पाइप!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : बाळे परिसरातील राहुलनगर आणि डुमणेनगर येथून चोरट्यांनी महापालिकेचे 11 लाख 81 हजार 787 रुपयांचे 302 पाइप चोरून नेले. ही घटना 14 फेब्रुवारी रोजी पहाटे तीन ते चार यावेळेत घडली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(VIDEO) चित्तथरारक तलवारबाजी करणारा साडे तीन वर्षाच्या विराज 

या प्रकरणात महापालिका विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता विक्रांत विलास लोकापुरे (वय 27, रा. व्यंकटेश अपार्टमेंट, रेल्वे लाइन्स, सोलापूर. सध्या- कर्णिकनगर, श्रीकृष्ण दुग्धालयाजवळ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ट्रक चालकासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनी जलवाहिनी खराब झाल्याने महापालिकेच्यावतीने बाळे परिसरातल राहुलनगर आणि डुमणेनगर येथे नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी महापालिकेच्या पथकाने राहुलनगर आणि डुमणेनगर येथे पाइप आणून ठेवले होते. चोरट्यांनी एकूण 302 पाइप 14 फेब्रुवारी रोजी पहाटे ट्रकमधून चोरून नेले. महापालिकेच्या पथकाने नगरसेवक गणेश पुजारी यांच्यासोबत पाहणी केली. या परिसरातील रहिवासी नाईकनवरे यांनी ट्रक घेऊन आलेल्या लोकांनी पाइप नेल्याचे सांगितले. 14 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री "मी गाडीचा आवाज झाल्याने उठून घराबाहेर आलो. त्यावेळी मला पाच ते सहा लोक महानगरपालिकेचे पाइप ट्रकमध्ये ठेवताना दिसले. पाइप कोठे घेऊन चालला आहे असे विचारल्यानंतर इससे बडा पाइप लानेका है.. असे त्या लोकांनी सांगितल्याचे नाईकनवरे म्हणाले. नाईकनवरे यांनी ट्रकच्या उजेडात ट्रकचा नंबर पाहिल्याचे सांगितले. 
दरम्यान, नाईकनवरे यांनी पाहिलेला ट्रकचा नंबर चुकीचा असल्याचे तपासात समोर आले आहे. चोरट्यांचा तपास चालू असल्याचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने यांनी सांगितले. 

मित्रानेच पळवली मित्राची बायको अन्‌ मग...

सेटलमेंट परिसरात कोयत्याने मारहाण 
तुम्ही येथे राहू नका.. तुम्ही लवकर रूम खाली करा.. असे म्हणून मारहाण केल्याप्रकरणी रोहित पंडित हत्तुरे (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणी सोमनाथ गायकवाड (वय 22, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) यांनी सलगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 14 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सेटलमेंट फ्री कॉलनी परिसरात घडली. रोहिणी गायकवाड आणि त्यांचे पती घरासमोरील कट्ट्यावर बसले होते. त्यावेळी तडीपार आरोपी रोहित हत्तुरे याने रोहिणी गायकवाड यांच्या पतीसोबत वाद घातला. तुम्ही येथे राहू नका.. तुम्ही लवकर रूम खाली करा असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी गल्लीत राहणाऱ्या अमोल चंद्रकांत गायकवाड यांनी आरोपी हत्तुरे यास तू असे का करतो.. असे म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावर रोहित हत्तुरे याने थांब तुला बघतो.. असे म्हणून घरात जाऊन कोयता आणला. गायकवाड यास उलटा कोयता करून खांद्यावर मारहाण केली. फिर्यादीच्या पतीलाही रोहित हत्तुरे याने मारहाण केली. अमोल गायकवाड यांच्या आईलाही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

रिक्षात गॅस भरणाऱ्यावर कारवाई 
घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस रिक्षामध्ये भरणाऱ्या लक्ष्मण यल्लप्पा गायकवाड (वय 35, रा. शहानगर, हनुमान मंदिराच्या मागे, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई अमोल जाधव यांनी सलगरवस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शहानगर येथील हनुमान मंदिराच्या परिसरात करण्यात आली. आरोपी गायकवाड हा इलेक्‍ट्रिक मोटरच्या साह्याने घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस रिक्षामध्ये भरत असताना पोलिसांना सापडला. गॅस हा ज्वालाग्रही पदार्थ असून तो जवळ बाळगणे धोकादायक असल्याचे माहित असूनही त्याने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोन गॅस टाक्‍या, इलेक्‍ट्रिक वजन काटा, रिक्षा, इलेक्‍ट्रिक मोटार, एक हजार 320 रुपयांची रोकड असा एकूण 90 हजार 323 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

loading image