पतंग उडविण्यासाठी वापरु नका नायलॉनचा मांजा, अन्यथा...

महाराष्ट्रात नायलॉन मांजा वापरण्याचे प्रमाण लक्षणीय
Solapur Crime
Solapur Crimeesakal

सोलापूर : नायलॉन मांजामुळे दुखापत, जिवितहानीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. तरीही, महाराष्ट्रात (Maharashtra) नायलॉन मांजा (Nylon Manja) वापरण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) त्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार नायलॉन मांजा(Nylon Manja), प्लास्टिक (Plastic) अथवा तशा कृत्रिम पदार्थापासून बनवलेला मांजा, ज्यामुळे पक्षांना अथवा माणसांना धोका होईल, अशा मांजाचा पतंग (Kites) उडविण्यासाठी वापर करता येणार नाही. तसेच अशा धाग्यांची निर्मिती, विक्री करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशाठिकाणी पतंग उडवू नये, कोणत्याही ठिकाणी तशा स्पर्धा आयोजित करू नयेत, असे आवाहन पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी केले आहे. अन्यथा, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Solapur Crime
सोलापूर : पतीला सोडा म्हणत महिलेने अंगावर ओतून घेतले पेट्रोल

दवाखान्यातून पळविली महिलेची पर्स

सोलापूर : चोरट्याने दवाखान्यामधून एका महिलेची पर्स चोरून नेल्याची घटना जुनी फौजदार चावडी येथील शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेदिक दवाखान्यात घडली. अखलाक लालसाहेब शेख (रा. बरुर, ता. दक्षिण सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी त्या चोरट्याचा शोध सुरु केला आहे. तत्पूर्वी, फिर्यादीची पत्नी त्या दवाखान्यात गेल्या होत्या. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना पंचकर्मासाठी बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील पर्स बेडवर ठेवून डॉक्‍टरांकडे गेल्या. पंचकर्म करून आल्यानंतर त्यांना पर्स त्याठिकाणी दिसली नाही. त्यामध्ये पाच हजारांची रोकड, मोबाइल, दीड हजारांचे चांदीचे पैंजण, बॅंकेचे एटीएम कार्ड, कागदपत्रे असा मुद्देमाल होता. पुढील तपास पोलिस हवालदार लोहार हे करीत आहेत.

दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

सोलापूर : सात रस्त्याजवळील नाना-नानी पार्क परिसरातील सिटी बस स्टॉपसमोरील रोडवर एका दुचाकीस्वाराने समोरील दुचाकीस्वाराला मागून जोरात धडक दिली. या अपघातात महेश संभाजी काटकर (रा. दक्षिण कसबा, लक्ष्मी मार्केट रोड) हे गंभीर जखमी झाले. ही घटना 2 जानेवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमी काटकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर किशोर संभाजी काटकर यांनी (एमएच 12, पीएल 2720) या दुचाकीस्वाराविरुध्द सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मात्रे हे करीत आहेत.

Solapur Crime
सोलापूर जिल्ह्यात तब्बल 91 लाख टन ऊस गाळप

घरात चोरी करणारा चोरटा रंगेहाथ पकडला

सोलापूर : विजयपूर रोडवरील आदित्य नगरातील स्वप्नील विजयकुमार घाटे हे मावशीला भेटण्यासाठी बारामतीला गेले होते. सोमवारी (ता. 3) रात्री उशिरा ते घरी परतले. त्यावेळी त्यांच्या घराचा सेफ्टी दरवाजा उघडा दिसला. त्यांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळी आतमध्ये एक व्यक्‍ती असल्याचे त्यांना जाणवले. त्यावेळी तो चोरटा घराच्या वॉल कंपाउंडवरून उडभ टाकून पळला. त्यावेळी घाटे यांनी त्यांच्या लहान भावाला आवाज दिला. त्यांनी त्यास पकडले. चोरी करण्याच्या हेतूने तो घरात शिरला होता. शिवाजी अण्णप्पा माशाळे (रा. वैष्णवी नगर, बाळे) असे त्या संशयिताचे नाव असून फिर्यादी घाटे यांनी त्याला विजापूर नाका पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक फौजदार वाल्मिकी हे करीत आहेत.

गतिरोधकजवळ गाडीचा कमी केला वेग; मागील वाहनाच्या धडकेत मोठे नुकसान

सोलापूर : हैदराबाद रोडवरील मुळेगाव क्रॉस रोडजवळील गतिरोधकजवळ नकुल सुरेश चव्हाण (रा. योगेश्‍वर नगर, जुना विडी घरकूल) यांनी त्यांच्या इनोव्हा गाडीचा (एमएच 13, एझेड 5709) वेग कमी केला. त्यावेळी मागून आलेल्या कंटेनरने (एमएच 12, एचडी 7187) त्यांच्या वाहनाला जोरात धडक दिली. या अपघातात चव्हाण यांच्या इनोव्हा गाडीचे दोन लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी चव्हाण यांनी त्या कंटेनर चालकाविरुध्द जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली. ही घटना सोमवारी (ता. 3) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. पुढील तपास पोलिस हवालदार दुधाळ हे करीत आहेत.

जुनी पोलिस लाईनमधून दुचाकीची चोरी

सोलापूर : हॅण्डल लॉक करून घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने पळविली. ही घटना मुरारजी पेठेतील जुनी पोलिस लाईन येथे घडली. या प्रकरणी अविनाश मोरे यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. तत्पूर्वी, फिर्यादी मोरे यांनी रात्री घरी परतल्यानंतर दुचाकी घरासमोर लावली होती. त्यावेळी त्यांनी दुचाकीचा हॅण्डल लॉक केला होता. तरीही, चोरट्याने रात्रीचा फायदा घेऊन हॅण्डल लॉक तोडून दुचाकी पळवून नेली. पुढील तपास सहाय्यक फौजदार लिंबोळे हे करीत आहेत.

Solapur Crime
सोलापूर : ‘आष्टी’ची पुन्हा बैठक; ‘घाटणे’चा प्रश्‍न मार्गी लागणार

भाजी खरेदी करताना चोरट्याने पळविला मोबाइल

सोलापूर : येथील घोंगडे वस्तीतील भाजी मार्केटमधून भाजी खरेदी करत असताना व्यापाराच्या खिशातून चोरट्याने मोबाइल लंपास केला. याप्रकरणी दत्तात्रेय शंकरसा गांगजी (रा. इंदिरा वसाहत, भवानी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत. पंधरा हजार रुपयांचा मोबाइल होता, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. पुढील तपास पोलिस नाईक वाघमारे हे करीत आहेत.

जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर गुन्हा

सोलापूर : येथील माणिक कॉर्नर बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर 54 पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरुध्द सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार रामा भिंगारे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गौस उमर रजभरे, अश्‍पाक अब्दुल रजाक बागवान, साजिद रहेमान पटेल, अभिषेक तुकाराम जाधव, अनिल मारुती कळंब (सर्वजण रा. सिध्देश्‍वर पेठ, पंचकट्टा), पवन रूपसिंग राठोड, राकेश नरसिंग हुच्चे (दोघेही रा. दत्त चौक) आणि अलीम अब्बासअली जेवळे (रा. बाळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सरतापे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com