Pradhan Mantri Awas Yojana : १८ हजार कुटुंबांना निवाऱ्याची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pradhan Mantri Awas Yojana 18 thousand families are waiting for shelter solapur

Pradhan Mantri Awas Yojana : १८ हजार कुटुंबांना निवाऱ्याची प्रतीक्षा

सोलापूर : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेला सात वर्षे पूर्ण झाली. गेल्या पाच वर्षांपासून प्रत्यक्षात फक्त ऑनलाइन अर्जांनाच गती आली. पाच वर्षात शहरातील केवळ एक हजार २८७ कुटुंबांना आवास योजनेतून निवारा मिळाला असला तरी अद्याप १८ हजार कुटुंब निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.

केंद्र व राज्य शासनाकडून गेल्या ४० वर्षांत विविध आवास योजना राबविण्यात आल्या. परंतु या योजना ठराविक वर्गांपुरत्याच मर्यादित होत्या. झोपडपट्टीसह मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी चार घटकांमध्ये विस्तृत स्वरुपातील सुधारित आवास योजना म्हणून २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजना अस्तित्वात आली.

३१ मार्च २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हा या योजनेमागचा मुख्य उद्देश होता. योजनेत पारदर्शीपणा असावा यासाठी याची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. मात्र कागदपत्रांच्या त्रुटीअभावी अनेकांना त्याचा लाभ घेता आला नाही. घटक एकमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन, पुनर्विकासाचा समावेश आहे.

घटक दोनमध्ये बॅंकेतून घरकर्जासाठी काढलेल्या रक्कमेच्या व्याजावर अनुदान देण्यात येते. तर घटक तीनमध्ये महापालिका सर्वसामान्यांच्या आवाक्यातील घरे बिल्डरामार्फत उभी करण्यात येणार होती. घटक चारमध्ये ज्याच्याकडे जागा आहे, त्या कुटुंबांना अडीच लाखाचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. असे सर्व घटक समावेशक ही योजना आहे.

या चारही घटकांपैकी घटक दोनच्या लाभार्थींची संख्या ही सर्वाधिक असून थेट कर्जदार आणि बॅंक यांच्याशी निगडित हा व्यवहार आहे. दरम्यानच्या काळात बिल्डरांनी घरे घेण्यासाठी प्रोत्साहित करताना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गृहकर्जाकरिता बॅंक प्रकरणाची जबाबदारी घेतली.

बिल्डर, बॅंक यांच्याशी निगडित विषय असल्याने हजारो कुटुंबांना याचा लाभ मिळाला. मागील पाच वर्षात १ हजार २८७ कुटुंबांना घरे देण्यात आली तर अद्यापही अर्ज भरून वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांची संख्या ही १८ हजार इतकी आहे.

योजनेतील सर्वसमावेशक चार घटक

 • घटक एक : झोपडपट्टीतील रहिवाशांचे पुनर्वसन, पुनर्विकास

 • घटक दोन : बॅंकेतून गृहकर्जावरील व्याजावर सूटसाठी अनुदान

 • घटक तीन : मध्यमवर्गातील कुटुंबांना परवडणारी घरे

 • घटक चार : ज्या कुटुंबाकडे जागा आहे, त्या कुटुंबाला घर बांधण्यासाठी अडीच लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान

शहरातील संख्या व प्रतीक्षेतील कुटुंब

घटक तीन

 • अर्ज प्राप्त ः ५७ हजार

 • मंजूर ः १४ हजार ६०५

 • लाभधारक : १ हजार ३६

घटक चार

 • अर्ज प्राप्त ः १५००

 • मंजूर ः ५९२

 • लाभधारक ः २७२

 • रद्द झालेले अर्ज ः ३४३

महापालिका म्हणते १४ हजार घरांचे नियोजन

शहरात दहिटणेत १२०० घरे, मजरेवाडीत ३७१०, अंत्रोळीकर नगर ५२०, अक्कलकोट रोड २८०, सलगरवस्ती ५७४१, नई जिंदगी २४६४ आणि दहिटणे रोड शेळगी येथे २५२ आदी ठिकाणी राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्था, सहस्त्रार्जुन गृहनिर्माण संस्था, अशा विविध गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून तब्बल १४ हजार १७५ घरांचे प्रकल्पाचे काम सुरू आहे. येत्या काही वर्षात निवाऱ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांना याला लाभ मिळणार आहे.