मोठी बातमी ! शरद पवारांना 'हे' विद्यापीठ देणार डी. लीट. पदवी

 1sakal_20_2834_29.jpg
1sakal_20_2834_29.jpg

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना डी. लिट. पदवी दिली जाणार आहे. सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी मांडलेल्या प्रस्तावाला रिपाइंचे राजाभाऊ सरवदे, राजेंद्र गायकवाड व चंद्रकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले. हा ठराव सिनेट सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.

राज्यपाल भवनाकडून ठरणार तारीख 
माजी केंद्रीय कृषीमंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कृषीसह देशाच्या विकासात त्यांचे योगदान मोठे राहिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव डी.लिट. पदवी देऊन करावा, असा ठराव सिनेट सदस्य प्रा. गायकवाड यांनी आज सिनेट अधिसभेत मांडला. त्याला बहुमताने मंजुरी मिळाल्यानंतर आता तो प्रस्ताव विद्या परिषदेच्या माध्यमातून राज्यपाल भवनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर पवार यांना पदवी देण्यासंदर्भात तारीख निश्‍चित होणार आहे. विशेष म्हणजे रिपाइंचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ सरवदे यांनी त्या प्रस्तावाला सिनेट सदस्य म्हणून अनुमोदन दिले. 

सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट मंडळाची आज बैठक झाली. यावेळी 2020-21 च्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली तर आगामी वर्षाच्या 278 कोटी 97 लाखांच्या अर्थसंकल्पास यावेळी मान्यता देण्यात आली. गतवर्षीच्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे 38 कोटींची तुट दाखविण्यात आली आहे. यावर सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांच्यासह अन्य सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारात धारेवर धरले. तर आगामी अर्थसंकल्प वाढीव का, असाही प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी नॅक मूल्यांकनामुळे आणि विद्यापीठाची नवी प्रशासकीय इमारत होत असून त्याठिकाणी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचीही इमारत होणार असल्याचे उत्तर कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिले. याचवेळी सचिन गायकवाड म्हणाले, शरद पवार यांचे देशासाठी व महाराष्ट्रासाठी मोठे काम असून त्यांना विद्यापीठाकडून डि.लीट. पदवी देण्याचा प्रस्ताव सभेत मांडला. त्यावेळी रिपाइंचे ज्येष्ठ नेते तथा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासह अन्य दोन सिनेट सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले. ठराव बहुमताने मंजूर झाला असून आता तो विद्या परिषदेच्या माध्यमातून पुढील आठवड्यात शिक्‍कामोर्तब होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com