Solapur : उड्डाणपूल, समांतर जलवाहिनी विषय केंद्रस्थानी

पालकमंत्र्यांनी घेतला सुक्ष्म आढावा; आठ दिवसात लावणार मुंबईत बैठक, विषय मार्गी लावण्यासाठी सचिवांशी संपर्क
Radhakrishna Vikhe-Patil three important issues of city two flyovers parallel waterways and water supply
Radhakrishna Vikhe-Patil three important issues of city two flyovers parallel waterways and water supply sakal

सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शहरातील दोन उड्डाणपूल, समांतर जलवाहिनी आणि शहराचा पाणीपुरवठा या तीन महत्त्वाच्या विषयांचा सुक्ष्म आढावा घेतला. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आपल्या अनुभवाचा दाखला देत थेट सात विभागांच्या सचिवांना संपर्क साधून विषय तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना आढावा बैठकीदरम्यान केल्या. पालकमंत्र्यांनी मनावर घेतलेले हे विषय लवकर मार्गी लागतील असे चित्र यातून निर्माण झाले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील दोन उड्डाणपुलांचे भूसंपादन, समांतर जलवाहिनी, शहराचे विस्कळित पाणीपुरवठा भोवतीच शहराचे राजकारण फिरत आहे. सोमवारी (ता.२४) पालकमंत्री विखे-पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असताना या तिन्ही विषयांचा त्यांनी सूक्ष्म आढावा घेतला. समांतर जलवाहिनीतील राजकारण, शहराच्या विस्कळित पाणीपुरवठ्याबाबत प्रशासकीय नियोजन आणि उड्डाणपूल भूसंपादनातील तांत्रिक अडचणी आदी बाबींची सविस्तर माहिती घेतली.

गढूळ पाणी, सुरळीत पाणीपुरवठा आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई होऊ नये, यासाठी आवर्तनासह वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित विभागाच्या सचिवांना फोनद्वारे संपर्क साधून महापालिका स्तरावरील बऱ्याच अडचणी दूर केल्या.

तसेच उड्डाणपूलाच्या भूसंपादनात सत्ता प्रकार बी, मालकी हक्कावरून वाद, विविध विभागाच्या शासकीय जमिनीचा ताबा या विषयावरही सविस्तर चर्चा केली. निधीचा विषय शासन स्तरावन मार्गी लावू, निधीची कमतरता कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले. तर प्रसंगी मुंबईत सर्व विभागांची संयुक्त बैठक लावू. मात्र येत्या महिन्याभरात जागा भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या.

दरम्यान समांतर जलवाहिनी निविदेचा विषय हा अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे. पूर्वीचा मक्तेदार आणि स्मार्ट सिटी कंपनी यांनी एकमेकांविरुध्द १५० ते १९८ कोटींचा दावा दाखल केला आहे. यापूर्वी जुन्या मक्तेदाराने काम केले आहे, नवीन १७० क्षमतेचे काम ६१५ कोटीचे आहे. ते २० कोटी इतक्या कमी दरात करण्यास तयार असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले. परंतु, शहराच्यादृष्टीने समांतर जलवाहिनी अत्यंत जिव्हाळ्याची आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जॅकवेलच्या कामाला सुरवात होणे गरजेचे आहे. हा विषय लावादासमोर असल्याने विषय प्रलंबित आहे. यातून पालकमंत्र्यांनी प्रशासनाला पर्यायी मार्ग सूचवित त्यानुसार, प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले.

पालकमंत्र्यांनी या दौऱ्यावेळी महापालिका आयुक्तांशी थेट भेट घेत सगळ्या विषयांमधील बारकावे जाणून घेत आपल्या प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव आणि शासन दरबारातील सचिवांमधील घनिष्ठ मैत्रीमुळे बैठकीतच सात सचिवांना फोन करीत शहराचे प्रश्न मार्गी लावण्याची वाट मोकळी करून दिली. शहर विकासाच्यादृष्टीने आवश्यक असलेले प्रस्ताव, प्रलंबित प्रस्ताव, त्रुटींची पूर्तता करून फेरसादर करण्यासाठीचे प्रस्तावाची माहिती देण्याबाबत सूचना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com