माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ शहरावर कायमच अन्याय केला; रमेश बारसकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramesh Baraskar

माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ शहरावर कायमच अन्याय केला; रमेश बारसकर

मोहोळ : तालुक्याचे भाग्यविधाते म्हणवुन घेणाऱ्या माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ शहरावर कायमच अन्याय केला आहे, मोहोळ शहरातील 579 घरकुले रद्द होतात, 349 घरकुले प्रतीक्षा यादीत आहेत.

असे असताना अनगर नगरपंचायतीला मात्र 470 घरकुले मंजूर होतात हा दुजा भाव कशासाठी, दहा हजार लोकसंख्येच्या अनगर नगरपंचायतीस 27 कोटीचा निधी मिळतो मात्र 45 हजार लोकसंख्या असणाऱ्या मोहोळ नगरपरिषदेला पाच कोटीचा ही निधी मिळत नाही हा काय प्रकार आहे,

राजन पाटील हे तालुक्याचे नेते आहेत असा आमचा गैरसमज होता मात्र ते फक्त अनगरचेच नेते राहिले आहेत एकदा त्यांनी तसे जाहीर करावे म्हणजे त्यांच्यावर टीका करण्याचा आमचा वेळ जाणार नसल्याचे प्रतिपादन मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले.

मोहोळ शहरातील 579 घरकुले नगरपरिषद प्रशासनाने विविध कारणे देत रद्द केली आहेत, तर एक 349 प्रतीक्षा यादीत आहेत, ती मंजूर करावीत रद्द झालेल्या घरकुलाच्या निषेधार्थ बारसकर यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ नगर परिषदेवर "आसूड मोर्चाचे" आयोजन केले होते त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.

बारसकर पुढे म्हणाले, सन 2017 18 साली मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांनी ती बांधूनही त्यांचा पहिला व दुसरा हप्ता न दिल्याने या 579 जणांनी घरकुले बांधले नाहीत हे वास्तव आहे. हे सर्व कारस्थान नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या अभियंत्याने केले असल्याचा आरोप बारसकर यांनी केला.

गेल्या दोन दिवसांपूर्वी नगर परिषदेसमोर घरकुलासाठीच आंदोलन झाले त्याला आजी व माजी आमदारांनी येऊन पाठिंबा दिला, मात्र आमदार यशवंत माने हे त्या ठिकाणी भाषण करू शकले नाहीत कारण त्यांना वास्तव माहिती आहे. मात्र "पगारीवर" काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर तोंडसुख घेतले त्यांनी एक लक्षात ठेवावे ते मोहोळचे आहेत एक दिवस याचा विचार त्यांना करावा लागेल.

यावेळी शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ब्रह्मदेव भोसले म्हणाले, शहराचा विकास केवळ बारसकर करू शकतात, आमदार माने यांना अनगर व परिसरातील दहा हजाराच्या मताचा गठ्ठा दिसत असेल परंतु मोहोळ शहरातील नागरिकांनीही त्यांना मतदान केले आहे. त्यांनी शहराच्या विकास साधावा.

यावेळी अॅड विनोद कांबळे म्हणाले, शहराचा विकास ठप्प झाला आहे. माजी आमदार पाटील यांनी अनगर नगरपंचायत करून शहराचा विकास मुद्दाम थांबविण्याचे पाप केले आहे. नामंजूर झालेली घरकुले पुन्हा मंजूर करून आणू अन्यथा रस्त्यावर उतरू. दलित वस्तीसाठी आलेला निधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी खर्च केला हे मुख्याधिकारी डॉ. डोके यांच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या बेईमान अधिकाऱ्यांनी केले आहे.

यावेळी संगीता पवार, सुरज जाधव, पद्माकर देशमुख, शीलवंत क्षीरसागर, रियाज शेख, शांतीकुमार अष्टुळ, शाहीर हावळे, अतुल क्षीरसागर, यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मुन्ना हरणमारे, अजय कुर्डे, मंगेश पांढरे, तनवीर शेख, आदी सह बहुसंख्य शहरवासीय उपस्थित होते.