esakal | Maharashtra Bandh : हा बंद म्हणजे राजकीय स्टंट : भाजप तालुकाध्यक्ष चव्हाण; मोहोळ तालुक्‍यात संमिश्र प्रतिसाद!
sakal

बोलून बातमी शोधा

हा बंद म्हणजे राजकीय स्टंट : भाजप तालुकाध्यक्ष चव्हाण

लखीमपूर (उत्तर प्रदेश) येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला मोहोळ तालुक्‍यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

हा बंद म्हणजे राजकीय स्टंट : भाजप तालुकाध्यक्ष चव्हाण

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : लखीमपूर (Lakhimpur) (उत्तर प्रदेश) (Uttar Pradesh) येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पुकारलेल्या बंदला (Maharashtra Bandh) मोहोळ (Mohol Taluka) तालुक्‍यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मोहोळ शहरातील 83 टक्के व्यवहार सुरू होते. दरम्यान, येत्या काळात पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा बंद म्हणजे राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण (Sinil Chavan) यांनी दिली.

हेही वाचा: भाजप सरकार निगरगट्ट, क्रूर व शेमलेस : प्रणिती शिंदे

लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. मोहोळ तालुक्‍यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी बंद पाळण्यात आला. त्यात नरखेड व परिसरातील देगाव, एकुरके, डिकसळ, वाळूज या गावांचा समावेश आहे. तर अनगर येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार प्रशांत बेडसे यांना कालच निवेदन देण्यात आले होते.

दरम्यान, कामती बुद्रूक येथे तालुका शिवसेना प्रमुख अशोक भोसले यांच्या नेतृत्वाखाली घटनेचा निषेध नोंदवून सभा घेण्यात आली. निषेधाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. या वेळी प्रकाश पारवे, लिंगराज व्हनमाने, सिद्धेश्वर माने, विनोद आंबरे, रवी पवार, विजय पवार, हरिश्‍चंद्र अवताडे, दीपक माळी, तानाजी राठोड, प्रवीण भोसले, संतोष सावंत, सुभाष पाटील, प्रकाश मोटे हे उपस्थित होते.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण म्हणाले, आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीने केलेला हा राजकीय स्टंट आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार करून जीवे मारण्याच्या घटना घडल्या आहेत, शेतकरी आत्महत्या होत आहेत, असे असताना या घटना दिसल्या नाहीत का? यासाठी बंद का केला नाही? शेतकरी सध्या अडचणीत आहे, त्याला मदतीची गरज आहे, त्यावर कोणीच बोलत नाही. या घटना निषेधार्थ असताना बंद का पाळला जात नाही? सध्या पवार फॅमिलीवर जे धाडसत्र सुरू आहे त्यापासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पश्‍चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना घडली त्याचा निषेध का केला नाही? सध्या कोरोनाचा काळ आहे, व्यापारी पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाला आहे, अशा परिस्थितीत बंदचे आवाहन करणे कितपत योग्य आहे, याचे आत्मपरीक्षण करावे.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर म्हणाले, बंद पाळण्याची आवश्‍यकता नव्हती. लखीमपूरची घटना ही चुकीचीच आहे, त्याचं समर्थन कोणीच करणार नाही; परंतु मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले तरी चालले असते. विनाकारण व्यापारी व शेतकऱ्यांना वेठीला धरण्याचा हा प्रकार चुकीचा आहे.

हेही वाचा: पवारांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला धक्का! सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभागाने पाच अधिकारी, 56 कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात केला आहे, तर चार वाहनांच्या माध्यमातून फिरती गस्त सुरू ठेवण्यात आली आहे. अनगर, नरखेड, सावळेश्वर टोल नाका, चिंचोली एमआयडीसी, सावळेश्वर, शेटफळ, कुरुल, अंकोली, टाकळी सिकंदर या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.

loading image
go to top