
सोलापूर ‘अग्निशामक’मध्ये ३५ फायरमॅनची भरती! दोन गाड्या, एक केंद्र वाढणार; ५ ते ८ मिनिटांत मिळणार मदत
सोलापूर : साडेबारा लाखांहून अधिक लोकसंख्या (अंदाजित तीन लाख घरे) असलेल्या स्मार्ट सिटीतील अग्निशामक विभागाचा कारभार आठ गाड्या आणि ३६ कामगारांवर सुरु आहे. त्यामुळे अनेकांना वेळेवर मदत मिळू शकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. आमदार सुभाष देशमुखांनी त्यावर अधिवेशनात आवाज उठवताच आता त्याच्या सक्षमीकरणाचा विषय महापालिकेने हाती घेतला आहे.
सोलापूर शहरात अग्निशामक विभागाची पाच केंद्रे आहेत. पण, आता सोलापूर शहराचा विस्तार वाढल्याने त्या केंद्रांवरून शहराच्या दुसऱ्या टोकाला पाण्याचे बंब घेऊन जाण्यासाठी विलंब लागतोय. त्यामुळे अग्निशामक विभाग तेथे पोचेपर्यंत घटनास्थळी होत्याचे नव्हते झालेले असते. २०२३ मध्ये अडीच महिन्यांत नुसत्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत आठ घटना आगीच्या घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळवून दोन गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. तसेच मार्चअखेर ३५ फायरमॅनची पदे भरली जाणार आहेत. अक्कलकोट एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीजवळ अग्निशामक विभागाचे स्वतंत्र केंद्र सुरु केले जाणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत कोठेही आग लागल्यास अवघ्या पाच ते आठ मिनिटात त्याठिकाणी पोचणे शक्य होणार आहे. सध्या १० ते १४ मिनिटे लागतात. पण, त्यानुसार कार्यवाही कधीपर्यंत पूर्ण होणार की आगीच्या घटनांमध्ये आणखी नुकसानच पाहावे लागणार, हे आगामी काळच ठरवेल.
दोन गाड्या वाढतील; एमआयडीसीत एक केंद्र वाढणार
सोलापूर शहरात अग्निशामक विभागाचे पाच सेंटर असून आठ गाड्या आहेत. अग्निशामक विभाग अधिक सक्षम व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आणखी दोन गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. तर एमआयडीसीत आणखी एक केंद्र वाढविण्याचे नियोजन केले आहे.
- केदार आवटे, अग्निशामक विभागप्रमुख, सोलापूर महापालिका
आमदार सुभाष देशमुखांनी मांडली उद्योजकांची बाजू
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीत फेब्रुवारी महिन्यात आठ आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जवळपास तीनशेहून अधिक कामगारांचा उदरनिर्वाह बंद पडला आहे. दुसरीकडे कारखानदार तथा उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागल्यानंतर त्यांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित असतानाही सोलापूर महापालिकेची अग्निशामक दल तेवढे सक्षम नसल्याने मदत वेळेत मिळाली नाही. त्यासंदर्भात राज्य सरकारने सकारात्मक विचार करून त्या उद्योजकांना मदत मिळावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. त्यानंतर पालकमंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ४) सोलापुरात बैठक देखील पार पडली. त्यावेळी अग्निशामक दल अधिक सक्षम करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे.