esakal | महापालिकेची पदभरती ! आरोग्य विभागातील 120 जागांसाठी मागविले अर्ज

बोलून बातमी शोधा

Doctor
महापालिकेची पदभरती ! आरोग्य विभागातील 120 जागांसाठी मागविले अर्ज
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरात सध्या तीन हजार 529 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. शहरातील विविध रुग्णालयांतून कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. मात्र, बॉईज हॉस्पिटल वगळता शहरातील एकाही नागरी आरोग्य केंद्रातून कोरोना बाधितांवर उपचार देता आलेले नाहीत. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याचीही अडचण आहे. या पार्श्‍वभूमीवर आता महापालिकेने फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, औषध भांडारपाल, एक्‍स-रे टेक्‍निशियन व लॅब टेक्‍निशियनची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेची वैद्यकीय सुविधा सुधारावी आणि रुग्णांची त्या ठिकाणी सोय व्हावी या हेतूने आरोग्य विभागात एकूण 120 पदे भरण्याचा निर्णय आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. मानधनावर नियुक्‍त केले जाणारे वैद्यकीय कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर भरती केले जातील. त्यांची मुदत सहा महिन्यांसाठीच असेल, गरज पडल्यास त्यांना पुढे मुदत वाढवून दिली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी महापालिकेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी अथवा अधिकाऱ्यांशी परस्पर संपर्क करू नये, अशा सक्‍त सूचना आयुक्‍तांनी दिल्या आहेत. त्यांनी ऑनलाइन अर्ज करावा, असेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठीwww.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करावयाचा आहे.

हेही वाचा: डॉक्‍टरचा दिलदारपणा ! उद्‌घाटनापूर्वीच दिले हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी

दरम्यान, या पद भरतीत पाच फिजिशियन भरले जाणार असून त्यांना दरमहा प्रत्येकी 75 हजारांचे मानधन दिले जाणार आहे. तर 62 वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली जाणार असून त्यात एमबीबीएसची पदवी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची 18 पदे भरली जाणार आहेत. त्यांना दरमहा प्रत्येकी 60 हजारांचे तर बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस पदवी असलेल्यांसाठी दरमहा 30 हजारांचे मानधन दिले जाणार आहे. औषध भांडारपालाची सहा पदे भरली जाणार असून त्यांना दरमहा प्रत्येकी 20 हजारांचे तर बारावी उत्तीर्ण तथा जीएनएमएस कोर्स उत्तीर्ण असलेल्या 50 स्टाफ नर्सही भरल्या जाणार आहेत. त्यांना दरमहा प्रत्येकी 20 हजारांचे तर एक्‍स-रे टेक्‍निशियनला दरमहा 17 हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. सहा लॅब टेक्‍निशियनची भरती केली जाणार असून त्यांना प्रत्येकी 17 हजारांचे मानधन दिले जाईल, असेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे. नव्याने नियुक्‍त होणाऱ्यांना कोरोनासंबंधीची कामे करावी लागतील, असेही त्यांनी सांगितले.

"त्या' बडतर्फ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घेणार का?

महापालिकेच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांना निकषांत बसत नसतानाही लस टोचल्याप्रकरणी महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी डफरीन हॉस्पिटलमधील दोन महिला कर्मचाऱ्यांसह तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर नगरसेविका फुलारे यांनी आयुक्‍तांना निवेदन देऊन संबंधितांना कामावर पुन्हा घ्यावे, अशी निवेदनाद्वारे विनंती केली होती. त्या वेळी आगामी काळात त्यांना पुन्हा कामावर घेऊ, असे आश्‍वासन आयुक्‍तांनी दिल्याचेही फुलारे यांनी सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर आता त्या कर्मचाऱ्यांना या पद भरतीत संधी दिली जाणार का, याची उत्सुकता आहे.