निर्बंध शिथिलतेने यात्रांना आले उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jatra

निर्बंध शिथिलतेने यात्रांना आले उधाण

मंगळवेढा - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष तरुणांईसह अनेकांच्या उत्साहाला सांस्कृतिक कार्यक्रमावरील बंदीमुळे अटकाव घालावा लागला. मात्र, शासनाने घातलेले निर्बंध शिथिल केल्यामुळे तुंबलेला उत्साह यात्रेतून पुन्हा सळसळू लागला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने सभा, सांस्कृतिक व गर्दीच्या ठिकाणी एकत्र येण्यास निर्बंध घातले होते. त्यामुळे चित्रपटगृहे, यात्रेतील आर्केस्ट्रा, पार्टीसह विविध सांस्कृतिक कला सादर करणारे कार्यक्रमावर याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे कलेवर अवलंबून असणाऱ्या अनेकांना पोटासाठी संघर्ष करावा लागला काहींनी तर पर्यायी व्यवसाय निवडला. मात्र, पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून वाढलेली कोरोनाची साखळी नियंत्रण आणण्यात आरोग्य खात्याला प्रशासनाला यश आल्यामुळे जनजीवन पुन्हा पूर्ववत झाले. त्यामुळे दोन वर्षे बंद पडलेले शहर व ग्रामीण भागातील यात्रा व सांस्कृतिक कार्यक्रम सध्या धूमधडाक्यात सुरू झाले आहेत.

शहरातील शिवजयंती, गैबी उरूसाबरोबर माचणूर, मुंढेवाडी या यात्राउत्साहाबरोबरच चैत्र महिन्यात असणाऱ्या भालेवाडी, लवंगी, आंधळगाव, तळसंगी, खोमनाळ, हिवरगाव, गोणेवाडी या प्रमुख गावच्या जत्रा उत्साहात साजरा करण्यात आल्या. नुकतेच मरवडे फेस्टिवलच्या निमित्ताने अनेक सांगली, कोल्हापूर, पुणे, येथील नामवंत सांस्कृतिक कार्यक्रम लोकांसमोर सादर करण्यात आले. यात्रेच्या निमित्ताने ग्रामदेवता ना बोललेल्या नवसाची बोकडा सह कोंबड्यांचा बळी देऊन पूर्ती देखील केली. सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाकाराच्या अदाकारीला लोकांनी भरभरून दाद दिल्यामुळे गेली दोन वर्ष भर घराबाहेर न पडलेला तरुण, नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यानिमित्ताने या कलाकारांच्या देखील कलेचे सादरीकरण होऊन त्यांच्या उपजीविकेचा सुरुवात झाली.

‘आंधळगाव’च्या घटनेला लागले गालबोट

यात्रेनिमित्त लावलेल्या गाण्यावरून झालेल्या वादातून जातिवाचक शिवीगाळ तर दुसऱ्या गटाकडून देखील शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. एकुणाच या उत्साहाच्या भरात तरुणाने परस्परविरोधी गुन्हे दाखल केल्यामुळे अशा सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील गालबोट लागू लागले. यावर वेळीच नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

अतिउत्साहावर पोलिसांचे लक्ष

सध्या उत्साहाच्या भरात अनेक तरुणाईकडून वाहन बेजबाबदारीने चालवणे, मद्यपान करणे व काही अनेक अनिष्ट कृती घडू लागली. मात्र, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील व पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी सध्या कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैद्य कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याच्या निमित्ताने चोरीच्या घटना घडू शकतात. म्हणून गावात अनोळखी व्यक्ती आली तर पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Restrictions Overwhelm The Yatra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top