
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा १ नोव्हेंबरपासून घेण्याचा निर्णय ठरला आहे. दिवाळीत काही दिवसांची सुट्टी असेल, पण दिवाळीपूर्वी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपविली जाणार आहे. १० ऑक्टोबरपासून परीक्षेचे अर्ज भरायला सुरवात होणार आहे.
विद्यापीठाशी संलग्नित जिल्ह्यातील १०८ उच्च महाविद्यालये आहेत. या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा पुढच्या महिन्यात घेतली जाणार असून त्यासाठी जवळपास ८५ हजार विद्यार्थी आहेत. या सत्र परीक्षेचे अर्ज भरायला १० नोव्हेंबरपासून सुरु होईल, असे परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पण त्याच काळात पंढरपूरच्या स्वेरी महाविद्यालयात तीन दिवस युवा महोत्सव रंगणार आहे. त्यामुळे १० की १४ ऑक्टोबरपासून परीक्षा फॉर्म भरायला प्रारंभ होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तत्पूर्वी, निकाल राखून ठेवलेल्या (आरआर) विद्यार्थ्यांचा तिढा सोडवावा लागणार असून त्यानंतर नवीन सत्र परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरवात होईल. त्यासाठी परीक्षेचे कामकाज पाहणाऱ्या संगणक कंपनीच्या अधिकाऱ्यांना विद्यापीठाने बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा करून अर्ज भरण्याची तारीख निश्चित होईल, असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले. दरम्यान, नूतन कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे गुरुवारी किंवा शुक्रवारी पदभार घेतील. त्यावेळी त्यासंदर्भातील अंतिम नियोजन होईल.
‘आरआर’ मार्गी लावण्यासाठी विशेष मोहीम
मागील सत्र परीक्षा होऊन ५० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला, तरीदेखील अद्याप सर्व अभ्यासक्रमांचे पूर्ण निकाल जाहीर झालेले नाहीत. आगामी सत्र परीक्षेचे अर्ज भरायला सुरवात होण्यापूर्वी आता निकाल राखून ठेवलेल्या (आरआर) जवळपास पाचशे विद्यार्थ्यांसाठी ३ ते ५ ऑक्टोबर या तीन दिवसांत विशेष मोहीम राबविली जाणार आहे. काही विद्यार्थ्यांचे पीआरएन क्रमांक चुकले आहेत तर काहींनी उत्तरपत्रिकेवर नंबरच टाकलेले नाहीत. काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका फाटल्याने स्कॅन होऊ शकलेल्या नाहीत. त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनाही पुढील सत्र परीक्षेला बसता येणार आहे.
आता परीक्षकांसाठी नवीन परिपत्रक
पेपर सुरु होण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दिली जाते. त्यावेळी विद्यार्थ्यांना त्यावरील संपूर्ण माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. पण, अनेकजण त्यावरील पीआरएन क्रमांक चुकीचा लिहितात, तर कोणी लिहीतच नाहीत. बैठक क्रमांक चुकीचा लिहितात आणि त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा निकाल मागे (आरआर) राहतो. हा प्रकार कायमचा बंद व्हावा म्हणून आता परीक्षेवेळी नेमलेल्या परीक्षकांना लिखित सूचना दिल्या जाणार आहेत. दुसरीकडे छोटे छोटे व्हिडिओ बनवून विद्यापीठातर्फे विद्याथ्यांना पाठविले जाणार आहेत. जेणेकरून ‘आरआर’चे प्रमाण कमी होईल, असा विश्वास विद्यापीठास आहे.