RTE प्रवेशाला २० फेब्रुवारीनंतर प्रारंभ! सव्वालाख मुलांना खासगी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE admission
RTE प्रवेशाला २० फेब्रुवारीनंतर प्रारंभ! सव्वालाख मुलांना खासगी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश

RTE प्रवेशाला २० फेब्रुवारीनंतर प्रारंभ! सव्वालाख मुलांना खासगी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश

सोलापूर : राज्यातील जवळपास नऊ हजार खासगी शाळांमध्ये सव्वालाख गरिब मुलांना ‘आरटीई’तून मोफत प्रवेश मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील २९५ खासगी शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली आहे. त्या नामवंत शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दोन हजार २९७ मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. पुढील आठवड्यापासून म्हणजेच २० फेब्रुवारीनंतर ऑनलाइन अर्ज करायला प्रारंभ होणार आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) नामवंत खासगी शाळांमधील एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागांवर दरवर्षी गोरगरीब कुटुंबातील मुलांनाही शिकण्याची मोफत संधी दिली जाते. शाळांना त्यासाठी नाव नोंदणी करणे बंधनकारक असून नोंदणीकृत शाळांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासह विधवा, परितक्त्या महिलांच्या मुलांनाही प्रवेश द्यावाच लागतो. सोलापूर शहर-जिल्ह्यातील २९५ शाळांनी यंदा ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली असून त्यात सोलापूर शहरातील १७ शाळा आहेत.

शहरातील त्या शाळांमध्ये २०१ मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. ज्या मुलांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने त्या प्रवेशात वशिलेबाजीला थारा नाही. अचूक अर्ज आणि पुरेसी कागदपत्रे असतील तर निश्चितपणे प्रवेश मिळतोच, अशी मागील वर्षीची स्थिती आहे.

विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या शासकीय वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज भरण्यासंदर्भातील माहितीसाठी होम पेजवर एक व्हिडिओ तसेच मार्गदर्शक सूचना असतात. याशिवाय, अर्ज करताना येणाऱ्या अडचणींची माहिती मिळावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्र असणार आहे. प्रवेश प्रक्रियेचा अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर केंद्रप्रमुखांकडे प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे द्यावी लागतात. त्याची पडताळणी होऊन पात्र-अपात्र मुलांची यादी निश्‍चित केली जाते.

तालुकानिहाय शाळा व प्रवेश

  • तालुका शाळा आरटीई जागा

  • अक्कलकोट १४ ११५

  • बार्शी २३ २६५

  • करमाळा २८ १०६

  • माढा ३६ २३७

  • माळशिरस ५१ ३१२

  • मंगळवेढा १२ ९४

  • मोहोळ १६ ११९

  • पंढरपूर ४७ ३४८

  • सांगोला २१ १५०

  • उ. सोलापूर २० १५२

  • द. सोलापूर १० ९८

  • सोलापूर शहर १७ २०१

  • एकूण २९५ २,२९७

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

  • निवासाचा पुरावा म्हणून रेशनकार्ड, आधार तथा मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बॅंकेचे पासबुक, टेलिफोन बिल, टॅक्स पावती, ड्रायव्हिंग लायसन

  • प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म दाखला

  • कुटुंबाच्या उत्पन्नाचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र तथा दाखला

  • प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या मुलांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र