समाधान अवताडेंना दिला भावानेच धक्का ! तर भगीरथांना मित्रपक्षांची डोकेदुखी

Awatade Brothers
Awatade Brothers

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. दुसरीकडे, भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांनीही आज उमेदवारी अर्ज भरून समाधान अवताडेंना धक्का दिला आहे. त्यामुळे एकीकडे भगीरथ भालके यांना मित्र पक्षातील बंडखोरीमुळे तर दुसरीकडे समाधान अवताडे यांना कुटुंबातील बंडाळीमुळे अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांच्या प्रमुख नेतेमंडळींकडून एकमेकाला शह- काटशह देण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांच्या पाठोपाठ महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी अर्ज भरून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंच्या अडचणी वाढवल्या आहेत. 

बंडखोरी केवळ महाविकास आघाडीच्या बाजूलाच झालेली नाही, तर त्याची लागण भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या गटातही झाली आहे. मंगळवेढ्यातील ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे यांचे पुत्र आणि समाधान यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर यांनी परवा दिवशी उमेदवारी अर्ज घेतला होता. त्यामुळे ते अर्ज भरणार का? याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आज सिद्धेश्वर यांनी उमेदवारी अर्ज भरून एक प्रकारे समाधान अवताडे यांना मोठा धक्का दिला असल्याचे मानले जात आहे. 

शैला गोडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील या दोघांनीही अर्ज भरून वेगाने प्रचार सुरू केला आहे. गावागावात जाऊन ते मतदारांच्या गाठीभेटी घेत असून विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. हे दोघे निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले, तर या दोघांची उमेदवारी भगीरथ भालके यांच्या दृष्टीने अडचणीची मानली जात असतानाच, भारतीय जनता पक्षामध्ये देखील आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांनीच आज उमेदवारी अर्ज भरून त्यांना धोक्‍याचे लाल निशाण दाखवले आहे. 

सिद्धेश्वर अवताडे यांनी निवडणूक लढवली तर समाधान यांच्या पारड्यातील मतांची विभागणी होऊन त्याचा मोठा फटका समाधान यांना बसणार आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ यांची मित्रपक्षातील बंडाळीमुळे तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान यांची कौटुंबिक बंडाळीमुळे डोकेदुखी वाढली आहे, हे निश्‍चित. 

दरम्यान, राष्ट्रवादीतील स्थानिक कार्यकर्त्यांमधील मतभेद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज संपवले. भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला माजी आमदार (कै.) औदुंबर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी जाहीर विरोध केला होता. पदाधिकारी निवडीवरून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार, शहराध्यक्ष भोसले हे नाराज होते. प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांनी आज सकाळी श्री विठ्ठल हॉस्पिटल येथे भगीरथ भालके यांच्यासह सर्व प्रमुख नाराज मंडळींची बैठक घडवून आणली. या बैठकीनंतर मतभेद संपले असल्याचे श्री. पाटील यांनी जाहीर केले. पक्षांतर्गत नाराजी दूर झाल्याने भगीरथ भालके यांच्या दृष्टीने आजची ही जमेची बाजू समजली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com