कार्तिकीसाठी रेल्वेच्या सात नव्या गाड्या! 50 हजार भाविक येतील असा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

trains

कार्तिकीसाठी रेल्वेच्या सात नव्या गाड्या!

पंढरपूर (सोलापूर) : ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर राज्य भरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, या संपाचा परिणाम कार्तिकी यात्रेवर व प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. एसटीची सेवा बंद असली तरी रेल्वेने मात्र कार्तिकीसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांसाठी सात नव्या रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. वारी साठी रेल्वेने 50 हजारांहून अधिक भाविक पंढरपुरात येतील असा अंदाज रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

हेही वाचा: आणि वारकरी आनंदले..! तब्बल वीस महिन्यांनंतर कार्तिकी यात्रा भरणार

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून कोणतीही यात्रा झाली नाही. दोन वर्षानंतर राज्य सरकारने कार्तिकी यात्रेस परवानगी दिली आहे. वारीसाठी राज्यभरातून सुमारे चार लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने राज्यभरातील प्रवाशी वाहतूक ठप्प झाली आहे. संपाचा मोठा परिणाम कार्तिकी वारीवर होण्याची शक्‍यता आहे. रेल्वेने मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी 12 ते 19 नोव्हेंबर दरम्यान, पंढरपूरसाठी विशेष सात नव्या रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. रेल्वेमुळे पंढरपूरला कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे.

हेही वाचा: कार्तिकी यात्रा काळात एसटी प्रवाशी वाहतूक सुरूच राहणार 

यात्रे दरम्यान रेल्वेवर वारकऱ्यांचा अधिकचा भार पडणार हे गृहीत धरुन रेल्वे विभागानेही तयारी पूर्ण केली आहे. तिकीट आरक्षणाच्या आणखी चार खिडक्‍या सुरु केल्या आहेत. रेल्वेस्थानकात पिण्याचे पाणी, दवाखान्याची सोय केली आहे. शिवाय स्वच्छतेसाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा: 'कार्तिकी'साठी येणाऱ्या भाविकांसाठी खासगी वाहनांची सोय !

कार्तिकी यात्रेसाठी लातूर -पंढरपूर, मिरज -पंढरपूर, लातूर - मिरज, मिरज- लातूर, बिदर- पंढरपूर-मिरज, अदिलाबाद- पंढरपूर, नांदेड- पंढरपूर व सांगली -पंढरपूर या नव्या गाड्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: कार्तिकी एकादशीनिमित्त सजताहेत पंढरीतील बाजारपेठा

एसटी संपामुळे भाविकांची संख्या घटण्याची शक्‍यता

ऐन कार्तिकीच्या तोंडावर एसटीची प्रवासी वाहतूक बंद राहणार असल्याने वारीवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यावर्षी 50 टक्केच वारी भरेल अशी शक्‍यता आहे. 2019 मध्ये झालेल्या कार्तिकी वारीसाठी एसटी बसने सुमारे 2 लाख 21 हजार तर रेल्वेने सुमारे 50 हजार भाविक पंढरपूरला आले होते. यावर्षी कोरोनाचे संकट आहे. त्यातच एसटी संपामुळे वारीवर 50 टक्के परिणाम होईल असा अंदाज एसटी आगार प्रमुख सुदर्शन सुतार यांनी व्यक्त केला आहे.

loading image
go to top