
Solapur: पुन्हा पाऊस पुन्हा पवार! सोलापूर दौऱ्यात राष्ट्रवादी रिचार्ज
सोलापूर: राज्यातील महाविकास आघाडीची गेलेली सत्ता, भविष्यात सत्ता येईल की नाही, याची असलेली चिंता. यामुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संभ्रमित झाला होता. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा पडलेला तिढा सोडवून शरद पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यात हजेरी लावली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवारी) सोलापूर शहर व जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्याने जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत उत्साह संचारला आहे. मरगळलेल्या कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रवादी पुन्हा’चा मेसेज गेला आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यापासून शरद पवार यांनी सुरू केलेला दौरा सांगोलामार्गे आज सोलापूर शहरापर्यंत येऊन थांबला. या दौऱ्यात पवारांनी जिल्ह्याच्या राजकारणाचा, बदलत्या समीकरणांचा कानोसा घेतला.
विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा आयत्यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश आणि २०२४ साठी पंढरपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यामुळे विठ्ठल परिवाराला वेळीच दिशा मिळाली आहे.
विठ्ठल कारखान्यावरील कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची एकत्रित उपस्थिती अनेक महिन्यांनंतर दिसली. सांगोल्यात आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार आटोपून पवार हे रात्री नऊच्या सुमारास सोलापुरात पोचले. पंढरपूर व सांगोल्यातील कार्यक्रमाने ग्रामीण राष्ट्रवादीला नवी ऊर्जा मिळाली आहे.
सोलापुरातील विविध चौकांमध्ये पवारांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागताच्या निमित्ताने शहरात देखील राष्ट्रवादीचे वातावरण तयार झाले आहे. माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या परिवारातील सदस्यांच्या विवाह सोहळ्यासाठी पवारांनी रात्री साडेनऊच्या सुमारास हजेरी लावली.
सोलापुरातील मरिआई चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती.