‘ती’ला मिळाली नुकसान भरपाई! अपघातात पाय तुटलेल्या महिलेसाठी जिल्हा न्यायाधीश आल्या प्रवेशद्वाराजवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur court
‘ती’ला मिळाली नुकसान भरपाई! अपघातात पाय तुटलेल्या महिलेसाठी जिल्हा न्यायाधीश आल्या प्रवेशद्वाराजवळ

‘ती’ला मिळाली नुकसान भरपाई! अपघातात पाय तुटलेल्या महिलेसाठी जिल्हा न्यायाधीश आल्या प्रवेशद्वाराजवळ

सोलापूर : पतीसोबत दुचाकीवरून कुर्डुवाडीला जाताना कुर्डू शिवाराजवळील आदी लक्ष्मी मंदिर परिसरात कारखान्याच्या टॅंकरने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील मंचली यांच्या पायावरून टॅंकर गेल्याने त्यांचा डावा पाय तुटला. आर्थिक मदतीसाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीने हा खटला जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे यांच्याकडे वर्ग केला. त्यांच्या प्रयत्नातून मंचली या महिलेला आर्थिक मदत मिळाली. त्यावेळी न्यायाधीश पांढरे या न्यायपीठावरून न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्या होत्या.

न्यायालयीन कामकाज करताना न्यायाधीश अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी कठोर भूमिका घेतात. पण, न्यायाधीश देखील संवेदनशील असतात व त्यांच्याकडे सहिष्णुता असल्याचे दर्शन बुधवारी (ता. ७) झाले. १० फेब्रुवारी २०२२ रोजी मंचली या त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून कुर्डुवाडीला जात होत्या.

त्यावेळी कुर्डू शिवारात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला आणि त्यात मंचली यांचा डावा पाय निकामी झाला. त्यांना कायमचे अपंगत्व आले. त्यांनी वाहन चालकाविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दिली होती. वैद्यकीय उपचारानंतर कायदेशीर सल्ला घेऊन त्यांनी नुकसान भरपाईसाठी न्यायालयात अर्ज केला होता.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या मंचलीची कहाणी ऐकून मध्यस्थीसाठी तो अर्ज जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे यांच्याकडे पाठवला होता. बुधवारी अर्जदाराचे वकील व्ही. आर. कोन्हाळे व टॅंकर मालक नागेश खटके न्यायालयात हजर होते. न्यायाधीशांच्या मध्यस्थीनंतर तडजोड झाली आणि मंचलीच्या चेहऱ्यावर हास्य पहायला मिळाले.

मदतीसाठी धनादेश व रोख रक्कम

जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर अपघातातील जखमी मंचलीला भरपाईपोटी काही रोख रक्कम व उर्वरित रकमेचा धनादेश मिळाला. हे सर्वकाही घडले न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच. मंचली यांचा डावा पाय निकामी झाल्याने त्यांना न्यायालयात येणे कठीण होते. व्हिलचेअरवर त्या न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबल्या होत्या. जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे या न्यायपीठावरून खाली उतरल्या आणि मंचलीजवळ पोचल्या. हे पाहून मंचली व तिचे कुटुंबीय भारावून गेले होते. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी सुनीता चोपडे, विजय माळवदकर, सचिन वडतिले व रहीम शेख यांनीही मदत केली.