esakal | "पुण्याहून स्वतंत्र नियोजन करून पाणी घ्या, उजनीतील पाणी उपसण्याचा आदेश रद्द करा !'

बोलून बातमी शोधा

Shiv Sena MLA Narayan Patil

नारायण पाटील म्हणाले की, पाणीवाटप समितीत अथवा नियोजनात प्रकल्पग्रस्तांचाही एक प्रतिनिधी असावा, ही मागणी आपण 2014 पासून करतो आहे.

"पुण्याहून स्वतंत्र नियोजन करून पाणी घ्या, उजनीतील पाणी उपसण्याचा आदेश रद्द करा !'
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : उजनीचे पाणी प्रदुषित होते यावर आळा घालण्यासाठी आपण विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती, यावर तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पुणे जिल्ह्यातील उद्योग व शहर प्रशासन यांना उजनी प्रकल्पात घाण, दुषित व सांडपाणी सोडू नयेत असे आदेश दिले होते. यामुळे जर सांडपाणी शब्दप्रयोग वापरुन नवीन उपसा सिंचन योजना मंजूर करत असतील तर या प्रकल्पासाठी थेट स्वतंञपणे यासाठी पुण्याहुन स्वतंत्र नियोजन करून पाणी घ्यावे, इंदापुरच काय इतर कुठलीही प्रस्तावित उपसा सिंचन योजनांना उजनीत समाविष्ट करुन अंतरिम मंजुरी देऊ नये, यासाठी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे.

याविषयी बोलताना नारायण पाटील म्हणाले की, पाणीवाटप समितीत अथवा नियोजनात प्रकल्पग्रस्तांचाही एक प्रतिनिधी असावा, ही मागणी आपण 2014 पासून करतो आहे. करमाळा मतदार संघाच्या विद्यमान आमदारांना पाणीवाटप धोरणात विचारात न घेता इंदापुर तालुक्यासाठीच्या नियोजित उपसा सिंचन योजनेस मान्यता दिली गेली कि विद्यमान आमदारांचीही यास संमती होती ? हे सत्य फार काळ झाकून राहणार नाही.

सन 2014 ते 2019 दरम्यानच्या माझ्या कालावधीत आपण शासनाकडे सिंचन व पुनर्वसन बाबतच्या ज्याकाही मागण्या प्रलंबित आहेत त्याचा गांभिर्याने विचार करुन त्या मान्य कराव्यात व नंतरच नवीन प्रकल्पाना अंतरिम मंजुरी द्यावी. दहिगाव उपसा सिंचन योजना 1995 साली मंजूर होऊन त्यासाठी 1.85 टिएसी पाणीसाठा दरवर्षीसाठी राखीव करण्यात आला. हा प्रकल्प 22 वर्षानंतर माझ्या कालावधीत पुर्ण झाला. तोपर्यंत या प्रकल्पाचे राखीव पाणी इतरत्र वापरले गेले. आज या प्रकल्पास 5 टिएसी पाणी मिळावे व आवर्तनात वाढ करावी, ही मागणी शासनाकडे प्रलंबित आहे. यामुळे या योजनेत वडशिवणे, झरे यासह अनेक गावांचा नव्याने समावेश होऊन सिंचनक्षेत्र वाढले जाईल.

उजनीतून मराठवाड्यास पाणी जाणा-या प्रकल्पाचेही काम युद्धपातळीवर सुरु आहे. यातही तालुक्यातील काही गावांचा समावेश करुन बोगद्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली जावी. वरील सर्व बाबींचा विचार होऊन अंमलबजावणी झाल्यास करमाळा तालुक्यास न्याय मिळेल. तोपर्यंत उजनीतुन पाणी नवीन प्रस्तावित प्रकल्पासाठी नियोजित करण्यास आपला विरोध राहील व वेळप्रसंगी जन आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार संजय शिंदे यांच्या पवार कुटुंब आपल्या ह्रदयात आहे. या वक्तव्यावर माजी आमदार नारायण पाटील यांनी माझ्या ह्रदयात करमाळा तालुक्यातील जनता असून त्यांची साद मला इतरांपेक्षा लवकर ऐकू येते. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आलो असून माझी बांधिलकी मतदार संघातील नागरिकांशी असल्याची बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली. उजनी प्रश्नासाठी वेळप्रसंगी वाटेल तेवढी राजकीय किंमत मोजायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातमीदार : आण्णा काऴे