esakal | Solapur: दीड वर्षात साडेसातशे अपघाती मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

सोलापूर : दीड वर्षात साडेसातशे अपघाती मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महामार्गांची कनेक्‍टिव्ही वाढल्यानंतर वाहनांचा वेग वाढला असून बेशिस्तपणाही वाढू लागला आहे. महामार्ग पोलिस, वाहतूक व स्थानिक पोलिसांची गस्त असतानाही अपघात आणि मृत्यू कमी झालेले नाहीत. मार्च २०२० ते १५ सप्टेंबर २०२१ या काळात सोलापूर ग्रामीण व शहरहद्दीत अंदाजित चौदाशे अपघात झाले असून त्यात ग्रामीणमधील साडेसहाशे तर शहरातील अपघातात ११० जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर- विजयपूर, सोलापूर- हैदराबाद, सोलापूर- उस्मानाबाद आणि सोलापूर- मिरज अशी रस्त्यांची कनेक्‍टिव्ही उत्तम झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. बेशिस्त वाहनांवर महामार्गांवर इंटरसेक्‍टर वाहनांद्वारे वॉच ठेवला जात आहे. ई-चालानच्या माध्यमातून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील जवळपास ५० हजारांहून अधिक वाहनांवर तशी कारवाई झाली आहे. त्यात अतिवेगाने वाहन चालविणे, मोबाईल टॉकिंग, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, लाईन कटिंग, हेल्मेट नाही, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, मद्यपान करून वाहन चालविणे अशा विविध कारणांचा समावेश आहे. तरीही, वाहनांचा वेग कमी झालेला नाही.

हेही वाचा: यशोगाथा : यशस्वी बागायतदार ते द्राक्ष संघाचे संचालक

बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असून महामार्गांची दुरुस्तीही पूर्ण झालेली नाही. दुसरीकडे शहरात वाहनांची वर्दळ वाढली असतानाही पर्यायी व्यवस्था झालेली नाही. दोन उड्डाणपुलांचा विषय अजूनही कागदावरच आहे. सिग्नल यंत्रणेत सातत्य राहिले नाही, अपघातप्रवण ठिकाणी वाहतूक पोलिस दिसत नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील चौक, शांती चौक, गुरुनानक चौक, ग्रामीण पोलिस मुख्यालयाशेजारील पेट्रोल पंपाजवळील चौक, रंगभवन चौक अशा ठिकाणी वारंवार अपघात घडतात आणि त्यासाठी जड वाहतूकच कारणीभूत ठरली आहे. वाढलेले अपघात व मृत्यू रोखण्यासाठी किमान महिन्यातून एकदा रस्ता सुरक्षा समितीची बैठक होणे अपेक्षित असते. तरीही, त्या बैठकांमध्ये नियमितपणा राहिलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे.

महामार्गांवर नाहीत जनजागृतीचे फलक

वाहनांचा वेग मर्यादित असावा, अपघात होऊ नये म्हणून वाहनचालकांमध्ये जागृती व्हावी याहेतूने महामार्गांवर फलक लावणे अपेक्षित आहे. मात्र, काही ठिकाणी ते फलक नसल्याचे चित्र असून बहुतेकठिकाणी तुरळक प्रमाणात फलक असल्याची स्थिती आहे. वाढते अपघात कमी व्हावेत याहेतूने ठोस प्रयत्न होताना दिसत नसल्याची ओरड येऊ लागली आहे.

loading image
go to top