Solapur News: रथाचे चाक निखळून दोन भाविकांचा मृत्यू Solapur Accident during Yatra Parameshwara Devalaya at Vagdari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur News

Solapur News: रथाचे चाक निखळून दोन भाविकांचा मृत्यू

अक्कलकोट : तालुक्यातील वागदरी येथे परमेश्वर देवालयाच्या यात्रेनिमित्त रथ ओढण्याचा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. याप्रसंगी रथाच्या चाकाचे रॉड तुटल्याने रथाचे दगडी चाक निखळून बाजूच्या भाविकांच्या अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला.

ही दुर्घटना आज (ता. २६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत व्यक्तीची नावे गंगाराम तिप्पण्णा मंजुळकर (वय ६८) व इराप्पा गिरमल नंदे (वय ४५) अशी आहेत. तालुक्यातील वागदरी या गावात आज (रविवार) परमेश्वर देवालयाची यात्रा होती. या ठिकाणी परंपरेप्रमाणे दरवर्षी रथ ओढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

रथ थांबविण्याच्या ठिकाणी रथ येत असताना रथाच्या चाकाचे लोखंडी रॉड तुटूल दगडी चाक बाजूला पडल्याने हा अपघात घडला. यात दोन भाविकांचा मृत्यू झाला. या गदारोळात यात्रेच्या बंदोबस्तावर असलेले सहायक पोलिस निरीक्षक महेश भावीकट्टी हे भाविकांच्या गर्दीमुळे खाली पडून जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांनी घटनास्थळी भेट दिली. रुग्णवाहिका बोलावून जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले.