सोलापूर : लवकर घरी परत येईन असे आश्वासन देऊन गेलेल्या वैष्णवीचा थेट आला घरी मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 वैष्णवी संतोष सरवदे

सोलापूर : लवकर घरी परत येईन असे आश्वासन देऊन गेलेल्या वैष्णवीचा थेट आला घरी मृतदेह

सोलापूर: आई कॉलेजमधील काम संपले आहे मी घरी निघाले आहे असे संगमेश्वर कॉलेजमध्ये बीए भाग तीन या वर्षात शिक्षण घेत असलेली बार्शी रोडवरील नामदेव सोसायटी, अंबिका नगर बाळे येथे राहणारी वैष्णवी संतोष सरवदे (वय 23) या तरुणीने आईला केलेला फोन कॉल शेवटचा ठरला. वैष्णवीची गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वाट पाहत असतानाच तिला सोलापूर-पुणे महामार्गावरील मडके वस्ती जवळ भरधाव कंटेनरने चिरडल्याने तिचा मृत्यू झाल्याची वार्ता कानी पडली. हादरवून सोडणार्‍या या निरोपावर विश्वासच बसत नव्हता. असे सांगताना वैष्णवीच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कॉलेजमधील काम संपवून घरी जाण्यासाठी दुचाकीने (एम. एच. 13 डी. के. 6109) निघाली असताना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मडके वस्ती नजीक मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (एम. एच. 46 ए. आर. 6188) वैष्णवी हिच्या दुचाकीला जोरदार धडक देत दुचाकीसह वैष्णवी हिला फरफटत नेले. हा अपघात इतका भीषण होता की, पाठीमागच्या चाकाखाली आल्याने वैष्णवीच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला तर दुचाकी चक्काचूर झाली होती. मृत वैष्णवीच्या पश्चात वडील, एल. एच. पी. कंपनीत कामास आहेत. आई गृहिणी आहे तर एक लहान भाऊ असा परिवार आहे.

गुरुवारी दुपारी कॉलेजमधील काम संपवून वैष्णवी पाच वाजण्याच्या सुमारास हसत खेळत निरोप घेऊन कॉलेजमधून घरी निघाली. मात्र एक तासांनी तिच्या मृत्यूची माहिती मिळताच कॉलेजमधील मैत्रिणींना धक्का बसला. वैष्णवीच्या मृत्युची बातमी कळताच त्यांना अश्रू अनावर झाले.

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक देत विद्यार्थिनी दुचाकीसह सुमारे 10 ते 15 फूट पर्यंत फरपटत नेले. या घटनेनंतर कंटेनर चालक कंटेनर रस्त्याच्या कडेला लावून पळून जात असताना नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याचा शोध घेऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने रस्ते अरुंद झाले असून, वाहतूक कोंडी होत आहे. यातूनच अपघात वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण विभागाने वाहन चालकांना पुन्हा एकदा शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

शहरातून वाहने चालविताना वेग मर्यादित असणे आवश्यक आहे. पण जड आणि छोटी वाहने सुद्धा भरधाव धावत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळते. यातूनच अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र वाहनांच्या वेगाला मर्यादा लावणार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याला वेळीच प्रतिबंध न लावल्यास अपघातांची मालिका सुरूच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक नियंत्रण विभाग काय पाउल उचलते याकडे लक्ष लागले आहे.

दुचाकीस्वारांनी महामार्गावरून प्रवास करताना सर्विस रोडचा वापर करावा. त्याचबरोबर हेल्मेट वापरावे. त्यामुळे अपघात झाल्यास प्राणहानी होणार नाही.

- उदयसिंह पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर

Web Title: Solapur Accident Students Traffic

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top