कर्मचारी संघटनांनी टोकाची भूमिका घेऊ नये : अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

कर्मचारी संघटनांनी टोकाची भूमिका घेऊ नये : अजित पवार

पंढरपूर : एसटी हे सर्वसामान्य आणि गरीब लोकांचे एकमेव प्रवासाचे साधन आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटनांनी अधिक टोकाची भूमिका न घेता, दोन पावले मागे सरकून मार्ग काढला पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सोमवारी (ता. १५) पहाटे अडीच वाजता कार्तिकी एकादशीची विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजेनंतर पवार यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटीचे सरकारीकरण करणे अशक्‍य असल्याचे सूतोवाचही केले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, देश पातळीवर एअर इंडिया ही कंपनी केंद्र सराकने विकली. एसटीच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पक्षाचे लोक तेथे बोलायला तयार नाहीत. एसटीची ६० वर्षाची मोठी परंपरा आहे. अनेक सरकारे आली आणि गेली परंतु अशा पद्धतीची मागणी एसटी संघटनांनी कधी केली नव्हती. ते त्याचे महामंडळ म्हणून काम करत होते.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

त्याना येणाऱ्या अडचणीच्या काळामध्ये मदत करण्याची भूमिका त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी पार पाडली. परंतु, अलीकडच्या काळात एसटीचे उत्पन्न घटल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. तरीही राज्य सरकारने गेल्या वर्षी एसटीला एक हजार कोटी पेक्षा जास्त मदत केली. आता पण ५०० कोटीची आर्थिक मदत केली आहे. एसटी ही सर्वसामान्य आणि गरीब लोकांसाठी प्रवासाचे एकमेव साधन आहे. हे आम्हाला असं पाहिजेच, त्याशिवाय ऐकणारच नाही, अशी टोकाची भूमिका घेवून चालणार नाही. सरकार आणि एसटी कामगार संघटनांनी एकत्र येवून दोन पावंले पुढेमागे सरकून त्यातून मार्ग काढला पाहिजे, असे पवार म्हणाले.

लसीकरणावर भर देण्याची गरज

चीन, रशिया, युरोपसह इतर अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी लस घेतली पाहिजे. तरच कोरोना संकटातून आपण सही सलामत बाहेर पडू, अन्यथा या संकटाला पुन्हा सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करत शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन प्रयत्न होणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.

loading image
go to top